गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसाला डेंग्यूचे डास पुरून उरले आहेत. जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापासून सातत्याने पाऊस लागून राहिला असतानाही ऑगस्टमध्ये अवघ्या सहा दिवसात पुण्यात डेंग्यूचे तब्बल १०८ संशयित रुग्ण आढळले आहेत.
अधूनमधून पडणारा पाऊस आणि विषम हवामान डासांच्या वाढीसाठी सर्वाधिक पोषक असल्याचे मानले जाते. मात्र काही दिवस सातत्याने पाऊस पडतच राहिला तर डासांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होणे अपेक्षित असते. १५ जुलैनंतर चांगला आणि सतत पाऊस पडू लागला. असे असून देखील डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येवर मात्र अजून फारसा परिणाम न झाल्याचेच दिसून येत आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ११०० संशयित रुग्ण तर मलेरियाचे ९९ रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी कुठेही पाणी साठून डास वाढू न देणे हाच महत्त्वाचा उपाय असून त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. डासांची वाढ झालेली आढळल्याबद्दल आतापर्यंत ११०० जणांना पालिकेने नोटिसा बजावल्या असून ८ जणांवर खटले भरण्यात आले आहेत. नोटिसा मिळालेल्यांमध्ये सोसायटय़ा, बांधकाम व्यावसायिक आणि इतरही व्यावसायिकांचा समावेश आहे.’’
पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारी सर्व रुग्णालये आणि प्रयोगशाळांकडे तपासणी केलेल्या डेंग्यू रुग्णांची माहिती आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोज घेत आहेत. डेंग्यू रुग्णांच्या घरी भेट देणे, त्यांच्या घरांच्या आसपास डासांची वाढ आढळल्यास औषध फवारणी करणे, आसपासच्या २०० ते २५० घरांमध्ये तापाचे आणखी रुग्ण आढळण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करणे ही कामे केली जात असल्याचे डॉ. वावरे यांनी सांगितले.
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी…
– घरात व परिसरात पाणी साठू देऊ नका. घराची गॅलरी, गच्ची, कुंडय़ा, घरातील एसी, कूलर, फ्रिजसारखी उपकरणे, इमारतीतील लिफ्टची डक्ट या पावसाचे पाणी साठण्याच्या नेहमीच्या जागा आहेत.
– पाण्याच्या टाक्या आणि पाणी साठवलेल्या भांडय़ांवर घट्ट झाकणे बसवा.
– तीन दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवू नका. पाण्याची भांडी पुन्हा भरण्यापूर्वी ती स्वच्छ घासून मगच वापरा.
– रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. शक्यतो लांब बाह्य़ांचे कपडे घालून झोपा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा