पुणे : राज्यात डेंग्यू आणि झिकाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचवेळी देशात डेंग्यू आणि झिकावरील लस विकसित करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. या दोन्ही रोगांवरील लशी विकसित करण्यात आल्या असून, त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात या लशी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.
देशात सध्या डेंग्यूच्या लशीवर चार संस्थांकडून संशोधन सुरू आहे. सरकारने राष्ट्रीय जैववैद्यक धोरणांतर्गत डेंग्यू लशीच्या चाचण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतीच याबाबत लोकसभेत माहिती दिली. त्यानुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) हैदराबादमधील पॅनासिआ बायोटेक कंपनीबरोबर डेंग्यूवरील लशीच्या चाचण्यांसाठी सामंजस्य करार केला आहे. डेंगीऑल असे या लशीचे नाव असून, तिच्या चाचण्या पाच वर्षांसाठी घेतल्या जाणार आहेत. ही डेंगीची एक मात्रा असलेली लस असणार आहे. तिची परिणामकारकता आणि सुरक्षितता तपासली जाणार आहे. या लशीची पहिली व दुसरी चाचणी पूर्ण झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतीय औषधे महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.
हेही वाचा >>> सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल
याचबरोबर इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) कंपनीकडूनही डेंग्यूची लस विकसित केली जात आहे. या लशीची पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरू होणार आहे. या लशीची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली असून, तिचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
भारत बायोटेककडून झिकावरील लशीचे संशोधन सुरू आहे. कंपनीने लस विकसित केली असून, झिकाच्या निष्क्रिया विषाणूचा वापर या लशीत करण्यात आला आहे. या लशीची पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संस्थेने या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे. यामुळे लवकरच या चाचण्या सुरू होतील.
हेही वाचा >>> पुणे: सासरच्या छळामुळे तरूणाची आत्महत्या; पत्नीसह सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध गुन्हा
एनआयएचकडून तंत्रज्ञान हस्तांतरण अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने (एनआयएच) डेंग्यूवरील लस विकसित केली आहे. या लशीचे तंत्रज्ञान जगभरातील अनेक कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यातून पॅनासिआ बायोटेक ही लस भारतासाठी विकसित करीत आहे.