पुणे : दातांमध्ये पोकळी आणि हिरड्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांची संख्या वाढत आहे. लहान मुलांमध्ये दहापैकी किमान सात जणांमध्ये दंत समस्या दिसून येत आहेत. दुधाचे दात पडणारच आहेत म्हणून त्यांच्या किडण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, ते चुकीचे आहे. मुलांची नियमित दंत तपासणी करावी, असा सल्ला दंतचिकित्सकांनी दिला आहे.

अनेक पालक आपल्या बाळाला रात्रीच्या वेळी बाटलीतून दूध अथवा फळांचा रस पाजतात. ही मुले ती बाटली तोंडात ठेवून झोपून जातात. यामुळे ते गोड पदार्थ रात्रभर बाळाच्या तोंडातील दातांवर साठून राहतात. तोंडातील जीवाणू याच गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात आणि दातांवर हल्ला करून अम्लपदार्थ सोडतात. यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात. हा प्रकार रोज घडल्याने दुधाचे दात पूर्णपणे किडतात.

याबाबत दंचचिकित्सक डॉ. अभिनव तळेकर म्हणाले की, बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या ५ ते १५ वर्षे वयोगटातील १० पैकी ७ मुलांमध्ये आता दंत समस्या आढळून येतात. लहान मुलांच्या दंत समस्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यात लक्ष न दिल्याने नंतरचे दात वाकडे येणे, दुधाच्या दातांमध्ये जागा नसेल किंवा हे दात वेडेवाकडे असतील तर पक्क्या दातांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणे, अशा समस्या दिसतात. यासाठी नियमितपणे दंत चिकित्साकांकडे जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे.

बाळाच्या दातांवर काळे किंवा पांढरे डाग पडणे, दात दुखणे, मुलांची चिडचिड होणे, दातांना थंड पदार्थांचा त्रास होणे, तोंडातून दुर्गंधी येणे तसेच दात किडणे अशा समस्या दिसून येतात. लहान मुलांमध्ये दंत समस्यांवर वेळीच उपचार केले नाहीत तर दुधाचे दात लवकर पडू शकतात. दातांचे आरोग्य हे मुलांच्या एकूण आरोग्याचा एक आवश्यक भाग आहे. त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. इतर आरोग्य समस्यांप्रमाणेच दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी दंत समस्यांवर वेळीच उपचार करावेत, असे अंकुरा हॉस्पिटलमधील नवजात शिशू विभागाचे प्रमुख डॉ. उमेश वैद्य यांनी स्पष्ट केले.

मुलांच्या दाताची काळजी कशी घ्यावी…

  • लहान मुलांच्या दातांच्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष द्या.
  • सुरुवातीपासूनच मुलांचे दात स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
  • मुलांना दिवसातून दोनदा टूथपेस्टने ब्रश करायला सांगा.
  • दात दुखू लागल्यास मुले चिडचिड करीत असल्याने त्यावर लक्ष ठेवा.
  • दाताच्या समस्या दिसून आल्यास दंतचिकित्सकांचा सल्ला घ्या.

Story img Loader