पुणे : दंतशस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर आता पुण्यात सुरू झाला आहे. भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाने फ्रान्समधील लुपिन डेंटलच्या सहकार्याने रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैद्यकीय चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. रुग्णांची काळजी आणि उपचारांचे परिणाम यात रोबोटिक तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल होणार आहेत. दंतचिकित्सा क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याची माहिती भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी दिली.

लेसरपासून मायक्रोस्कोप, कॅड कॅम, स्कॅनर अशी अत्याधुनिक साधने, उपचार उपलब्ध आहेत. दात काढणे, बसवणे इतकेच नाही, तर वेडेवाकडे दात सरळ करणे, हिरड्यांचे विविध आजार बरे करणे, जीभ, पडजीभ, ओठ, गाल यांच्या उपचारांत आता रोबोटिक तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. ‘फ्रान्समधील लुपिन डेंटलसोबतच्या सहकार्याने केवळ दंत रोबोटिक्समधील आमची तज्ज्ञता वाढवली नाही, तर आमच्या संस्थेला नावीन्यपूर्ण दंत शिक्षण आणि संशोधनात आघाडीचे स्थान मिळवून दिले आहे,’ अशी माहिती भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी दिली.

लुपिन डेंटलचे डॉ. गॅलिप गुरेल म्हणाले, ‘या नावीन्यपूर्ण प्रकल्पावर भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाबरोबर आम्ही काम केले. दंतशस्त्रक्रियेत वैद्यकीय चाचणी यशस्वी झाल्यामुळे दंतचिकित्सा क्षेत्रातील रोबोटिक तंत्रज्ञानाची क्षमता समोर आली असून, त्याचा भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे.’

भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान कार्यालयाच्या संचालिका डॉ. अरुंधती पवार, सह-संशोधक डॉ. संतोष जाधव, डॉ. पंकज कदम, डॉ. योगेश खडतरे आणि डॉ. सारा मरियम, डॉ. विक्रांत साने आणि डॉ. आमोद पाटणकर, लक्ष्मीकांत खानोलकर, डॉ. मनीषा जाधव यांनी या प्रकल्पात योगदान दिले.

रोबोटिक दंतशस्त्रक्रियेचे फायदे

– दंत शस्त्रक्रियेत अधिक अचूकता

– प्रक्रिया करण्यात अधिक सुलभता

– मानवी चुकांचे प्रमाण कमी होण्यास मदत

– शस्त्रक्रियेच्या अंतिम परिणामांमध्ये सुधारणा

– पारंपरिक पद्धतीपेक्षा उपचारांचा एकूण वेळही कमी- रुग्ण बरा होण्याचा कालावधीही कमी