‘ई मेल’वरून पाच महिन्यांची रजा आणि स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी महापालिकेच्या मध्यवर्ती औषध भांडार विभागाचे मुख्य व्यवस्थापक पाच महिन्यांपासून रजेवर आहेत. रजेवर असतानाच त्यांनी अचानकपणे स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही पाठवला आहे. हा सर्व पत्रव्यवहार ते ‘ई-मेल’द्वारे करत असून ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. कोणालाही त्यांच्याविषयी माहिती नाही. त्यांचे कुटुंबीय काहीही सांगत नाही. या सर्व प्रकारामुळे कमालीचे गूढ निर्माण झाले आहे. यामागचे नेमके कारण काय, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

औषध भांडार विभागाचे मुख्य कार्यालय यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या तळघरात आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांसाठी लागणारी औषधे, उपकरणे आदी वस्तूंची खरेदी येथून केली जाते. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हा विभाग चालतो. या विभागाचे मुख्य व्यवस्थापक असलेला हा अधिकारी पाच महिन्यांपूर्वी रजेवर गेला आहे. सुरुवातीला त्यांनी महिनाभराची रजा घेतली होती, मात्र पुढे जाऊन ती रजा आणखी एक महिन्याने वाढवून घेतली. असे करत आजअखेर त्यांनी पाच महिन्यांची रजा घेतली आहे. यासाठी ते प्रशासन विभागाला ‘ई मेल’द्वारे अर्ज करत आहेत. त्यांनी आणखी रजा वाढवून मागितली, तेव्हा प्रशासनाने त्यांना समक्ष हजर राहण्याची सूचना केली. त्यानंतर ते स्वत: हजर राहण्याऐवजी त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज प्रशासनाला प्राप्त झाला. हा अर्ज त्यांनीच लिहिला आहे का, त्यावर त्यांचीच स्वाक्षरी आहे का, अशी शंका प्रशासनाला आली. त्यामुळे प्रशासनाने संबंधित पिंपरी पालिका औषध विभाग व्यवस्थापक गायब होण्याचे गूढ व्यवस्थापकास सक्षम हजर राहण्याची सूचना केली. तसा निरोप त्यांच्या कुटुंबीयांकडेही पोहोचवण्यात आला. त्यानंतरही व्यवस्थापक स्वत: आले नाहीत, मात्र त्यांच्या वतीने त्यांचे बंधू पालिकेत आले. अशा परिस्थितीत काय करायचे, असे कोडे प्रशासनाला पडले होते. अखेर, तो स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अधिकाऱ्याच्या प्रदीर्घ रजेमागचे नेमके कारण काय आहे, याविषयी कोणीही खात्रीने सांगत नाही. त्यांचे खासगी कारण आहे, घरगुती कारण आहे, की कार्यालयीन गोष्टी त्यामागे आहेत, याचा अंदाज करता येत नसल्याने बरेच गूढ निर्माण झाले आहे. त्यांच्या निकटवर्तीयांना काही माहिती नाही. कुटुंबीय या विषयावर कोणाशीही बोलण्यास तयार नाही. त्यांनी फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप बंद केले आहे. त्यांचा मोबाइल संपर्क क्षेत्रात नसल्याचे सांगतो. प्रदीर्घ रजेपाठोपाठ थेट नोकरी सोडण्याच्या मन:स्थितीत ते आल्याने सर्वानाच आश्चर्य वाटत असून या बाबत कमालीचे गूढ निर्माण झाले आहे. पालिकेच्या कारभाराचा एक कटू अनुभव या अधिकाऱ्याने काही वर्षांपूर्वी घेतला आहे. इतरांनी संगनमताने केलेल्या उद्योगामुळे ते अडकले होते. त्यामुळे त्यांना वर्षभर सेवेतून निलंबित व्हावे लागले होते तेव्हा कोणी मदतीला आले नाही. या अनुभवातून धडा घेत त्यांनी इतरांच्या उद्योगामध्ये न पडण्याचा निर्धार केला होता. असेच काही खरेदीचे प्रकरण आहे की खासगी आयुष्यातील काही गोष्टी आहेत, याविषयी वैद्यकीय विभागात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, मात्र कोणीही खात्रीने सांगत नाही. या संदर्भात सातत्याने प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

रजेविषयीही माहिती नाही

या अधिकाऱ्याच्या प्रदीर्घ रजेमागचे नेमके कारण काय आहे, याविषयी कोणीही खात्रीने सांगत नाही. त्यांचे खासगी कारण आहे, घरगुती कारण आहे, की कार्यालयीन गोष्टी त्यामागे आहेत, याचा अंदाज करता येत नसल्याने बरेच गूढ निर्माण झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Department of medicine is missing in pimpri chinchwad municipal corporation