पुणे : शालेय शिक्षण विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील विविध विभागांतील १०८ शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले असून, शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) पुरस्कार प्रदान कार्यक्रम मुंबईत होणार आहे.
शिक्षक पुरस्कारांची घोषणा शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे शुक्रवारी केली. शिक्षण क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव पुरस्काराच्या रुपात १९६२-६३पासून करण्यात येतो. या पुरस्कारांसाठी राज्य समितीची बैठक २५ ऑगस्टला झाली. त्यानंतर विभागनिहाय निवडयादी शिक्षण विभागाला सादर करण्यात आली. त्यानुसार प्राथमिक विभागात ३७, माध्यमिक विभागात ३९, आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी १९, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी ८, विशेष कला-क्रीडा विभागात दोन, अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक विभागात एक, स्काऊट गाईड विभागात दोन असे एकूण १०८ शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.