पुणे : करोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांमुळे पंढरीची वारी आणि वैभवी पालखी सोहळ्यापासून दूर असलेल्या वारकऱ्यांमध्ये यंदा पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी अमाप उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भक्तिचैतन्याचा संग मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे. संतांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर निघणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोमवारी (२० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मंगळवारी (२१ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : पालखी सोहळ्याला पाणीटंचाईचा फटका? टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाल्या आहेत. आळंदी-देहूच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर खांद्यावर भागवत धर्माचा पताका घेतलेले वारकरी आणि डोईवर वृंदावन घेऊन निघालेल्या महिला दिसून येत आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये प्रत्येकाच्या मुखातून हरिभक्तीचे सूर निघत आहेत. आळंदी आणि देहू परिसरात आणि पंचक्रोशीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या राहुट्या दिसून येत आहेत. पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत असलेल्या वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांची तयारी केली जात आहे.

हेही वाचा >>> नागपूर : कळमना जवळील उड्डाण पूल कोसळण्याचे गूढ कायम, तज्ज्ञांच्या दोन समित्यांना कारणे शोधण्यात अपयश

तुकोबांच्या पालखीचे २० जूनला देहूतून प्रस्थान झाल्यानंतर त्या दिवशी पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. २१ जूनला माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. २१ जूनला पालखीचा मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यात असणार आहे. या दिवशी तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी पोहोचणार आहे. २२ मार्चला दोन्ही पालख्या पुणे मुक्कामासाठी मार्गक्रमण करणार आहेत. २२ जूनला संध्याकाळी माउली आणि तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी पोहोचेल. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर २४ जूनला दोन्ही पालख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतील.

हेही वाचा >>> सैन्यदलात अग्नीवीरांच्या भरतीचा कंत्राटदार कोण? जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला बोचरा सवाल

तुकोबांचे पालखी प्रस्थान दुपारी

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात २० जूनला पहाटेपासूनच होणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा आणि इतर विधी होतील. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत रामदास महाराज मोरे यांचे पालखी सोहळा काल्याचे कीर्तन आणि इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. दुपारी अडीचच्या सुमारास पालखीचे प्रस्थान होणार आहे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Departure of tukoba palkhi departure will be on monday and mauli palkhi will be on tuesday pune print news prd
Show comments