तानाजी काळे
इंदापूर : गेल्या वर्षी उजनी धरण १०० टक्के भरले. मात्र ,पाण्याचा वापर मोठय़ा प्रमाणामध्ये होत असल्यामुळे सध्या उजनी धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळय़ापर्यंत हा पाणीसाठा पुरवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असली तरी, घसरत्या पाण्याच्या पातळीबरोबर सखल भागांमध्ये पाणलोट क्षेत्रात पाणथळी निर्माण झाल्याने या उथळ पाण्यात माशांची शिकार करणे सोपे जात असल्याने पाहुण्या पक्ष्यांची चंगळ झाली आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणथळ जागांवर विविध जाती प्रजातीचे पक्षी माशांचा फडशा पाडत असल्याचे चित्र सध्या या परिसरात आहे. आपल्या कॅमेऱ्यात पाहुण्या पक्ष्यांचा पाहुणचार बंदिस्त करण्यासाठी हौशी छायाचित्रकार पक्षी निरीक्षकांची पावले उजनी जलाशयाकडे वळू लागली आहेत. यंदा उजनी धरण १०० टक्के भरले होते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या वर्षी पाऊस झाल्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत उजनी धरणामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पाणीसाठा उपलब्ध होता. मोठय़ा प्रमाणात पाणी असल्यामुळे पाणथळ जागा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे परदेशातून उजनी परिसरात आलेल्या पक्ष्यांची पंचायत झाली होती. मात्र, सध्या भीमा नदीपात्रातून सोलापूरसाठी पाणी सोडले जात असल्यामुळे रोज दोन टक्के पाणीसाठा उजनी धरणातून कमी होत आहे. त्यामुळे परिसरामध्ये पाणलोट क्षेत्राच्या भागात मोठय़ा प्रमाणामध्ये डबकी तयार होत असल्यामुळे अशा ठिकाणी माशांची शिकार करण्यास पक्ष्यांनाही सोपे जाते. सध्या उजनीच्या काठावरती विविध जातीचे पक्षी मोठय़ा संख्येने आलेले आहेत. त्यांचे जणू स्नेहसंमेलनच उजनीच्या तीरावर भरल्याचे चित्र आहे.
उजनी धरणाच्या पाण्यामध्ये दररोज मोठय़ा प्रमाणामध्ये घट होत असल्यामुळे घसरत्या पाण्याच्या पातळीबरोबर पक्ष्यांनीही आपला मुक्काम दूरवर लांबवला आहे. डाळज, काळेवाडी पळसदेव, कालठण, कांदलगाव त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील जिंती, खातगाव, वाशिंबे, चिखलठाण, कुगाव परिसरामध्ये पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा