लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तडीपार गुंडाला जेरबंद केले. त्याच्याकडून एक दुचाकी आणि सहा मोबाइल संच असा एक लाख ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड आणि अहिल्यानगर येथील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
अभिजित सुभाष रॉय (वय २५, रा. साने चौक, चिखली, मूळ – पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण – आळंदी फाटा येथे एकजण चोरीचे मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सापळा लावून अभिजित याला ताब्यात घेतले. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी-चिंचवड व पुणे शहर हद्दीत यापूर्वी घरफोडी व वाहनचोरीचे १९ गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी तडीपार देखील केले आहे.
आणखी वाचा-पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी आणि सहा मोबाइल संच असा एक लाख ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईत पिंपरी-चिंचवड मधील चाकण, भोसरी, दिघी, चिखली आणि अहिल्यानगर मधील तोफखाना पोलीस ठाण्यातील एक असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, शहरात तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे वावर असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. पोलिसांकडून तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे.