ग्रंथालय, प्रयोगशाळा, उपक्रम यांच्या नावाखाली शाळेपासून महाविद्यालयापर्यंत प्रत्येक शिक्षणसंस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत रकमा या शिक्षणसंस्थांच्या हक्काच्या मालमत्ता झालय़ा आहेत. नियमानुसार शिक्षण संपल्यानंतर किंवा शाळा, महाविद्यालय सोडल्यानंतर अनामत रक्कम परत करणे आवश्यक असतानाही शिक्षणसंस्था या रकमांचा अपहार करत असल्याचे समोर येत आहे.
प्रत्येक शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून शुल्काव्यतिरिक्त काही अनामत रक्कम घेते. विद्यार्थी संस्थेत शिकत असेपर्यंत संस्थेच्या कोणत्याही वस्तूचे नुकसान झाले किंवा विद्यार्थ्यांने आवश्यक तेवढे शुल्क भरले नाही, तर त्यासाठी ही अनामत रक्कम वापरण्यात येते. शाळा किंवा महाविद्यालय सोडताना विद्यार्थी किंवा पालकांना ही रक्कम परत करणे आवश्यक असते. मात्र, बहुतेक शिक्षणसंस्था अनामत रक्कम परत देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. एका विद्यार्थ्यांकडून अगदी ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेण्यात येते. दरवर्षी परत देण्याच्या बोलीवर गोळा केलेले लाखो रुपये शिक्षणसंस्था हडप करत आहेत.
अनेक वेळा अर्ज देऊनही तो शिक्षणसंस्थेकडून स्वीकारलाच जात नाही, निकाल अडवण्याची धमकी दिली जाते, संस्थेने दिलेले धनादेश वटतच नाहीत अशा तक्रारी शाळांबाबत पालकांनी आणि महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही अनामत रक्कम घेऊन, शासनाने शुल्क दिले नाही म्हणून ती परत देण्यासाठी शिक्षण संस्थांकडून नकार देण्यात येतो. याबाबत शालेय शिक्षण विभाग किंवा विद्यापीठही हात वर करते.
नामांकित शाळेबाबत तक्रारी
पुण्यातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या अल्पसंख्याक शाळेबाबत पालकांनी तक्रारी केल्या आहेत. या शाळेने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दहा हजार रुपये अनामत रक्कम घेतली होती. मात्र शाळेने आता ही रक्कम देण्यास नकार दिला आहे. पालकांनी वारंवार खेपा घातल्यानंतर काही पालकांना शाळेने धनादेश दिले, पण ते वटलेच नाहीत. या शाळेतील एका पालकांनी सांगितले, ‘माझ्या दोन मुली या शाळेत शिकत आहेत. आम्ही शाळा बदलल्यानंतर अनामत रकमेबाबत विचारणा केली. मात्र, शाळा ती देण्यास टाळाटाळ करत आहे. शाळेने दिलेले धनादेशही वटलेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना रक्कम देण्यास शाळेने नकारच दिला आहे.’
अभियांत्रिकी महाविद्यालये आघाडीवर
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा अनामत रक्कम अधिक घेतली जाते. मात्र, ती परत केलीच जात नाही. याबाबत पुण्यातील अनेक महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’ कडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत एका विद्यार्थ्यांने सांगितले, ‘आमच्याकडून ग्रंथालय आणि प्रयोगशाळेसाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली. मी २०१३ मध्ये उत्तीर्ण झालो. गेली दोन वर्षे मी महाविद्यालयाकडे अनामत रकमेबाबत विचारणा करत आहे. मात्र, महाविद्यालयाने ती देण्यास नकार दिला आहे. माझ्या बॅचला अभियांत्रिकीचे आम्ही जवळपास तीनशे विद्यार्थी होतो. आमच्यापैकी कुणालाच अनामत रक्कम देण्यात आलेली नाही. आमच्या नंतरच्या बॅचचीही हीच तक्रार आहे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा