भारतीय जनता पक्षाच्या हातात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार आला, तेव्हापासून सुरू असलेले पक्षांतर्गत वाद पराकोटीला गेल्याने पक्षाची शिस्त आणि पारदर्शक कारभाराची ऐशीतैशी झाली आहे. स्थानिक नेत्यांचे सारे उद्योग पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यातून मुख्यमंत्री व स्थानिक नेत्यांची होणारी बैठक दोन वेळा लांबणीवर पडल्याने अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. विरोधकांनी रान पेटवले असतानाच पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याने सुरू झालेला तमाशा भाजपला मारक ठरू शकतो. शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरू केली असली तरी पक्षात सध्या मरगळ आणि नैराश्येचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर भाजपमध्ये जो तमाशा सुरू आहे, ते पाहता पक्षातील जाणत्या मंडळींनी डोक्यावर हात मारून घेतला नसल्यास नवल वाटेल. मोदी लाटेनंतर देशभरात भाजपमध्ये आयारामांची गर्दी झाली. त्याच पद्धतीने, सर्वच पक्षांतील हवशे, नवशे, गवशे पिंपरी भाजपमध्ये दाखल झाले आणि तेव्हाच पक्षाचे भवितव्य काय असणार आहे, याचा अंदाज अनेकांना आला होता. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. दहा महिन्यांपूर्वी पिंपरी पालिकेची सत्ता भाजपच्या हातात आली, मात्र सत्ता कशी राबवावी, याचे ताळतंत्र जमले नाही म्हणून सगळा विस्कोट झाला आहे.
शहर भाजपमधील गटबाजी पाचवीला पुजलेली आहे. नवे पाहुणे पक्षात वाढल्यानंतर अंतर्गत कुरबुरी वाढत गेल्या. पूर्वाश्रमीच्या भाजपमध्ये शक्तिशाली मानला जाणारा मुंडे गट शहरातून संपवण्याचे राजकारण सुरू असून, जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे, असे आरोप सातत्याने होत आहेत. सत्ता येऊनही कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, सत्तेचे फायदे मिळत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची ओरड होती. आता तोच सूर नगरसेवकही आळवू लागले आहेत. प्रभागातील कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत, आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, असे नगरसेवकांचे रडगाणे सुरू आहे. पालिकेतील कारभार ठरावीक मंडळींच्या हातात एकवटला आहे, त्यांची कार्यपद्धती बहुतांश नगरसेवक व कार्यकर्त्यांना मान्य नाही. पक्षाची शिस्त, प्रतिमा, ध्येयधोरणे याच्याशी कोणाला काही देणंघेणं आहे, असे वाटत नाही. पक्षातील वातावरणात गढूळ होण्यास महापालिकेतील वादग्रस्त कारभार हेच दृश्य स्वरूपातील कारण ठरले आहे.
स्थायी समितीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचा आरोप करत भाजपला लक्ष्य करण्याचे काम विरोधकांनी सुरू केले आहे. रस्ते विकासाच्या कामात संगनमत झाले आणि त्यात ९० कोटींचा गोलमाल झाल्याचा आरोप शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव व श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांनी केल्याने राजकीय वादळ निर्माण झाले. त्यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी, त्या आरोपांना पुष्टी देत हा घोटाळा ९० कोटींचा नव्हे तर १२५ कोटींचा असल्याचा नवा आरोप केल्यामुळे आणखी खळबळ उडाली. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी प्रत्युत्तरादाखल थेट साबळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे साबळे समर्थक आक्रमक झाले व त्यांनी सीमा सावळे यांच्या हकालपट्टीची मागणी केली. आरोप-प्रत्यारोपांमुळे वाद वाढत गेले आणि पारदर्शक कारभाराची आणि पक्षाच्या शिस्तीची ऐशीतैशी झाली. यापूर्वी अंतर्गत वादाचे अनेक प्रकार घडले होते. या वादाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत बैठक आयोजित केली. मात्र, सलग दोन वेळा ती रद्द करण्यात आली, त्याचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात राहिले. ही बैठक झालीच पाहिजे, असा एका गटाचा आग्रह असताना, कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांसमोर पितळ उघडे पडू नये, यासाठी दुसऱ्या गटाचा आटापिटा सुरू होता. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची ग्वाही देत महापालिकेची सत्ता देण्याचे साकडे शहरवासीयांना घातले होते. प्रत्यक्ष कारभारात नको ते उद्योगच प्राधान्याने सुरू आहेत. गटबाजी व नाराजीतून सुरू असलेला सध्याचा पक्षांतर्गत तमाशा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपला मारक ठरू शकतो, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.
‘पक्ष कोणाच्या मालकीचा नाही’
पिंपरी शहर शिवसेनेत खांदेपालट झाले आणि बाबर परिवारातील योगेश बाबर यांच्या डोक्यावर शहरप्रमुखपदाचा काटेरी मुकुट चढवण्यात आला. पक्षात सध्या गटातटाचे राजकारण गंभीर पातळीवर आहे. पक्षात मरगळ आहे, नैराश्येचे वातावरण आहे. त्यातच बंडखोर आणि भाजपच्या वाटेवर गेलेल्या योगेश बाबर यांची शहरप्रमुखपदी निवड झाल्याने पक्षात नाराजीचा सूर आणि प्रचंड खदखद आहे. अशा वातावरणात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेतील मरगळ दूर करण्याच्या हेतूने पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक चिंचवड येथील संभाजीनगरला घेण्यात आली. सर्व तंत्रांचा वापर करून लढण्याचा मंत्र राऊत यांनी सर्वाना दिला. पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असून शिवसेनेला चांगले वातावरण आहे. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या आहेत. त्यामुळे आतापासूनच कामाला सुरुवात करा. संघटनात्मक बांधणी, पक्षविस्ताराला प्राधान्य द्या. मनातील निराशा बाजूला ठेवा, मरगळ झटकून टाका, असे आवाहन करतानाच राऊत यांनी पक्षातील स्वयंघोषित मालकांना खडे बोलही सुनावले. पक्ष कोणाच्या मालकीचा नाही. पक्षसंघटनेलाच कायम महत्त्व राहील. यापूर्वी निश्चितपणे काही चुका झाल्या आहेत. त्या यापुढे सुधारल्या जातील, असे त्यांनी ठणकावून सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व राहिले नसल्याने भाजप हाच मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष राहील. स्वबळावर लढल्यास शिवसेना राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनेल, असे सांगत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. शिवसेना हा प्रखर हिंदूुत्ववादी पक्ष आहे, मात्र भाजप हा हिंदूुत्ववादी पक्ष राहिला नाही. शिवसेनेने २०१४ मध्ये स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवून चांगले यशही मिळवले होते. त्यामुळे स्वबळावरील लढत शिवसेनेसाठी नवीन नाही. २५ वर्षांची युती तोडण्याचे पाप भाजपने केले. भाजपसाठी जे वातावरण २०१४ मध्ये होते, ते २०१९ मध्ये असणार नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ‘लक्ष्य २०१९’ साठीचे रणिशग फुंकले आहे. राज्यात शिवसेना हाच खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार आहे. शिवसेनेने खऱ्या अर्थाने राज्यात विरोधी पक्षाची भूमिका निभावली आहे. त्यानंतर अन्य पक्षांची ‘हल्लाबोल’ आंदोलने सुरू झाली आहेत, असे विविध मुद्दे सांगत राऊत यांनी शिवसैनिकांना डोस दिला खरा, मात्र त्याचा कितपत उपयोग होईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com