लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक यांसह विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठीच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता गणना दिनांकांमुळे अनेक इच्छुक उमेदवार वंचित राहत असल्याचा प्रकार समोर आला असून, शैक्षणिक पात्रता गणना दिनांक बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक यांसह विविध १११ पदांसाठीच्या भरतीची जाहिरात १९ जुलै रोजी प्रसिद्ध केली. त्यात क्रीडा अधिकारी संवर्गाची ५९ पदे, क्रीडा मार्गदर्शक संवर्गाची ५० पदे, लघुलेखक आणि शिपाई संवर्गाचे प्रत्येकी एक पद समाविष्ट आहे. या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता गणना दिनांक १ जून २०२३ निश्चित करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेच्या ऑनलाइन अर्जांसाठी १० ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र काही विद्यापीठांचे निकाल जुलैमध्ये जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे शैक्षणिक पात्रता गणना दिनांकामुळे अनेक उमेदवार अडचणीत आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार गोपाल भगुरे म्हणाले, की राज्यातील काही विद्यापीठांतील शारीरिक शिक्षण पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जुलैमध्ये जाहीर करण्यात आले. भरती प्रक्रियेच्या जाहिरातीतील शैक्षणिक पात्रता गणना दिनांक १ जून २०२३ असल्याने पात्रता असूनही माझ्यासारखे शारीरिक शिक्षण पदवीधारक पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या भरतीपासून उमेदवारांना वंचित राहावे लागत आहे. शारीरिक शिक्षण पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी भरतीची जाहिरात लवकर येत नाही, त्यात आता शैक्षणिक पात्रता दिनांकामुळे उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची दखल घेऊन शैक्षणिक पात्रता गणना दिनांक बदलण्यात यावा.
दरम्यान, या संदर्भातील वस्तुस्थिती तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक सूरज मांढरे यांनी सांगितले.