बारामती : ‘सन १९५२ पासून ज्यांनी बारामतीचे प्रतिनिधित्व केले आहे, तेव्हापासून प्रत्येकाची कारकीर्द पहा. त्यांनी काय काम केले ते पहा. बारामतीमध्ये काम करण्याची संधी मला १९९१ पासून मिळाल्यापासून मी काेणती कामे केली ते पहा. माझ्यासारखा आमदार तुम्हाला मिळणार नाही. मी जेवढे काम केले आहे. तेवढे कोणीही केले नाही,’ असा दावा उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केला.
पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. ते म्हणाले, ‘माझ्यासारखा आमदार पुन्हा मिळणार नाही, हा माझा दावा आहे. बारामतीकरांनी मला लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून दिले आहे. त्यामुळे मी थांबणार नाही. अंदाजपत्रकामध्ये कामांची तरतूद कशी करायची आणि निधी कसा आणायचा हे मला माहिती आहे.
दरम्यान, बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ एका हाॅटेलमध्ये तरुणाला झालेल्या बेदम माहराणीचीही गंभीर दखल अजित पवार यांनी घेतली. ‘या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. मोटारसायकलवरून आलेल्या चार तरुणांनी हाॅटेलमधील एकाला बेदम मारहाण केली. फुटबाॅल खेळात मारतात, तशी मारहाण तरुणाला केली.
या प्रकरणात कुणीही दोषी असला, तरी त्याच्यावर कारवाई करा, अशी सक्त सूचना मी पोलीस प्रशासनाला केली आहे. अजित पवारांच्या जवळचा कार्यकर्ता असला तरी किंवा त्याचा मुलगा असला तरी त्याचा बंदोबस्त करा, असे पोलिसांना सांगितले आहे. बारामतीमध्ये असले प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.