इंदापूर : ‘लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी घरी बोलाविले, जेवण दिले. मात्र, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अदृश्य हाताने प्रचार केला. हे असले वागणे आम्हाला कधी जमले नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. पाटील यांचा उल्लेख दलबदलू असा करतानाच उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी माणसे जनतेचे काय भले करणार, असा प्रश्नही उपस्थित केला.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी झालेल्या सभेत पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. आमदार अमोल मिटकरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, संजय सोनावणे, बाळासाहेब सरवदे आणि हनुमंत कोकाटे या वेळी उपस्थित होते.

हे ही वाचा… पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; सदनिकेसाठी १ हजार ९३२ नागरिकांची नोंदणी

राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयात ‘अदृश्य’ हात असल्याची कबुली हर्षवर्धन पाटील यांनी दिली होती. हा धागा पकडून पवार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी आम्हाला घरी बोलाविले. आश्वासने दिली. जेवू घातले. पण, अदृश्यपणे हात विरोधी उमेदवारासाठी वापरला. ते ही बाब स्वत: सांगत असतील तर ही गोष्ट कोणत्या नैतिकतेमध्ये बसते? ज्या पक्षामध्ये आपण असतो, त्या पक्षाचे काम करत नाही. त्यामुळे अशा दलबदलू लोकांवर जनता कसा विश्वास ठेवेल, असे पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा… ‘शिरूर’ची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे; माऊली कटके यांची उमेदवारी जाहीर

‘विधान परिषदेच्या बारा जागांवर आमदारांची नियुक्ती करायची आहे. त्यांपैकी सात जागा भरल्या आहेत. पाच जागा रिक्त आहेत. हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेचे आमदार केले जाईल, असे भाजप नेत्यांनी मला सांगितले होते. पण त्यांची थांबायची तयारी नव्हती,’ असा दावाही पवार यांनी केला.

तीन ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही इंदापूर तालुक्याचा विकास करता आला नाही. मात्र, गेली दहा वर्षे इंदापूरच्या विकासासाठी आमदार दत्तात्रय भरणे प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघात सहा हजार कोटींचा निधी त्यांनी आणला आहे. हा विकास पाहूनच भरणे यांना विजयी करून महायुतीचे हात बळकट करा, असे आवाहन पवार यांनी केले.