लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांनी महापालिकेच्या विविध विकासकामाची भूमिपूजन, उद्घाटने केली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रुग्णालयाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या निवासस्थान इमारतीचे उद्घाटनही त्यांनी केले.
वायसीएम रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर आता रूग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या ११ मजली इमारतीमधील दोन मजल्यावर नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना महापालिका आयुक्त सिंह यांनी दिली. त्यानंतर पवार यांनी तत्काळ वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन दिनेश वाघमारे यांना दूरध्वनी केला. तुम्ही माझ्यासोबत महापालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. हे आपले काम आहे. नर्सिंग महाविद्यालय उभारण्याच्या सर्व मान्यता देऊन नस्ती सोमवारपर्यंत माझ्याकडे आली पाहिजे अशी सूचना केली.
पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरीपर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोवरून धावत असताना खाली रस्त्यावर कचरा, धुळ, रस्ता दुभाजकाचा रंग गेला आहे. याकडे लक्ष देण्याची सूचना पवार यांनी आयुक्तांना करत नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यांनी ते मेट्रोकडे असल्याचे सांगितले. त्यावर मेट्रोचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांच्या कानावर हा विषय घालतो, असेही पवार म्हणाले.