पुणे : शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. शहरातील विविध भागात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा रस्त्यावर लागत आहेत. वाहनचालकांना तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते.‘शहरातील रस्त्यांवर सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रस्त्यांची स्थिती सुधारा, रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा. तसेच, सर्व यंत्रणांच्या मदतीने ‘सर्वंकष गतिशील आराखडा’ (मोबिलिटी प्लॅन) तयार करा,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना केल्या. महापालिकेच्या येणाऱ्या अंदाजपत्रकात रस्त्यांसाठी अधिक तरतूद ठेवावी, असेही पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शहरातील अनेक रस्त्यांवर सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीवर बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. महापालिकेकडून रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने केली जातात. त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने काम करण्याऐवजी रस्त्याचे एक सलग काम पूर्ण करा, अशी सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना केली.
हेही वाचा…परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर, गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी विद्यार्थ्यांची निवड
u
रस्त्यांवर निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतुकीच्या संबंधित पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, महामेट्रो, पीएमपीएमएम, पीएमआरडीए, मेट्रो, वाहतूक पोलीस यांनी एकत्र बैठक घ्यावी. तसेच गतिशील आराखडा तयार करावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेला जीएसटीचा हिस्सा मिळावा, समाविष्ट गावांमधील करवसुलीला दिलेल्या स्थगितीबाबत महापालिकेने पवार यांच्या समोर भूमिका मांडली. यावर नगरविकास विभागासोबत पुढील महिन्यात बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.