पुणे : हिंजवडीतील आयटी पार्क आणि औद्योगिक भागातील आस्थापनांपर्यंत पोहोचण्यासाठी स्कायबस हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोला पूरक सेवाही मिळणार आहे. या प्रकल्पाच्या परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच त्याचे भूमिपूजन केले जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे गुरुवारी दिली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सर्व प्रश्न सोडविले जातील आणि वस्तू आणि सेवा विधेयकातील तरतुदीनुसार निधी देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी बैठक घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार संजय काकडे या वेळी उपस्थित होते. राज्यात पाच वर्षे भाजपचे राज्य होते. त्या वेळी पुणे शहराचे चित्र आणि चेहरा बदलण्याचे काम करण्यात आले. विविध प्रकारच्या विकास योजना, राज्य, केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आल्या. पीएमपीच्या ताफ्यात सर्वाधिक विजेवर धावणाऱ्या गाड्या असून, देशपातळीवर या प्रारूपाचा गौरव करण्यात आला असून, ते देशातील अनेक राज्यांनी, शहरांनी स्वीकारले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले, की शहरात मेट्रोचे काम वेगाने प्रगतिपथावर आहे. मेट्रोच्या भुयारी मार्गाची चाचणीही झाली असून, येत्या काही दिवसांत शहरातील तिन्ही मेट्रो मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहेत. शहरात ५५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गिकांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. मेट्रो सेवेला पूरक सेवा म्हणून स्कायबसचा प्रयोगही राबविण्यात येणार आहे. विशेषत: हिंजवडीसारख्या औद्योगिक क्षेत्रात या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक आस्थापनेपर्यंत वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी परवानगी घेण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन त्याचे लवकरच भूमिपूजन केले जाईल.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत जाणारा वर्तुळाकार मार्ग हा शहराच्या विकासासाठी नवी संधी आहे. या वर्तुळाकार मार्गासाठी ८० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून वर्तुळाकार मार्गामुळे अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था पुण्यात निर्माण होणार आहे. त्यामुळे हा मार्ग इकाॅनाॅमिकल काॅरिडाॅर ठरणार आहे. याशिवाय मिसिंग लिंकमुळे पुणे आणि मुंबई शहरातील अंतर कमी होणार आहे. देशातील भविष्यातील शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करावे लागणार असून, त्यासाठी विविध योजना राबविण्याचे नियोजित आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.