लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या २६ किलोमीटर जलवाहिनीच्या कामासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी मावळ आणि खेड उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच हे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक जागेचे तातडीने भूसंपादन करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले. या पार्श्वभूमीवर विधान भवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आंद्रा आणि भामा आसखेड या दोन धरणातून २६७ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी पिंपरी-चिंचवडला आरक्षित केले आहे. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. यातून शहरातील पाणी समस्येवर तोडगा निघणार आहे. त्याचबरोबर उर्वरित आरक्षित पाणी येईपर्यंत वाढत्या भागाला पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यासाठी पुढचा जलवाहिन्यांचा टप्पा महत्त्वाचा असून २६ किलोमीटरच्या जलवाहिनीसाठी जागा भूसंपादित करायची आहे.
दरम्यान, एका महिन्याच्या आत संपूर्ण जागा महापालिकेला दिली पाहिजे. त्याबाबत काहीही अडचण असेल, तर माझ्याकडे बैठक घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सोमवारी सांगितले होते. त्यानंतर तातडीने विभागीय आयुक्त राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बैठक घेऊन जागा ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले.
पिंपरी-चिंचवड पाणीपुरवठा योजनेतील अडचणींबाबत मंगळवारच्या बैठकीत चर्चा झाली. या योजनेंतर्गत २२ हजार चौरस मीटर जागा ताब्यात घ्यायची आहे. मार्चअखेरीस महापालिकेकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी मावळ आणि खेड उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी