पुणे : करोना काळजी केंद्रातील धक्कादायक घोटाळा बाहेर आला होता. कोणतीही अनुभव नसलेली कंपनी लोकांच्या जीवाबरोबर कशी खेळत होती, हे सर्वानी पाहिले आहे. त्यामुळे मुंबईत छापे टाकण्यात आले. मात्र, या छाप्यात काय मिळाले, हे ईडीचे अधिकारीच सांगू शकतील, त्याबाबत मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. करोना काळजी केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईत ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांच्या मालमत्तेवरही ईडीने छापा टाकला आहे. यासंदर्भात पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी आले असताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत ईडीची नेमकी कोणती कारवाई सुरू आहे, याची माहिती नाही. मुंबई महापालिकेमध्ये करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आले. त्यावेळी करोना काळजी केंद्रातील घोटाळा बाहेर आला. त्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती पुढे आली होती. अनुभव नसलेल्या कंपनीला काम देण्यात आले होते. लोकांच्या जीवाशी खेळण्याचे काम कंपनीकडून करण्यात आले होते.

 पुण्यातही एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यासंदर्भात चौकशी सुरू आहे. मात्र, चौकशीत काय पुढे आले याची माहिती नाही. त्याबाबत ईडीचे अधिकारीच माहिती देऊ शकतील, असे फडणवीस यांनी सांगितले. आमदार गीता जैन यांनी महापालिका अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीसंदर्भात बोलताना फडणवीस यांनी संयम बाळगण्याचा सल्ला आमदार गीता जैन यांना दिला. कधीतरी संताप होऊ शकतो. राग अनावर होतो. मात्र, त्यानंतरही लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे योग्य आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis informed the officials of ed about the raids ysh