लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: विकासात विनाश होऊ नये हे खरे. मात्र, अर्धवट माहिती घेऊन प्रकल्पांना विरोध केला जातो. जगभरात यशस्वी झालेले प्रकल्प आपल्याकडे का यशस्वी होणार नाहीत. असे प्रकल्प राबवताना तुमची, माझी आणि खरी अशा तीन बाजू असतात. त्यामुळे तुमचे आणि माझे म्हणणे ऐकून घेऊन तज्ज्ञांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. लाखो पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील वेताळ टेकडी, नदीसुधार, नदीकाठ संवर्धन प्रकल्पांचे सोमवारी समर्थन करत पर्यावरणप्रेमींचे कान टोचले.
आणखी वाचा-महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये?, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधन या क्षेत्राची राजधानी पुणे आहे. पुणे जिल्हा राज्याचे उत्पादन केंद्र आहे. देशभरातील एकूण उत्पादनापैकी २० टक्के उत्पादन महाराष्ट्र करतो, त्यामध्ये सिंहाचा वाटा पुण्याचा आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुण्याला राहण्यायोग्य शहर बनवणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरात पायाभूत सुविधा चांगल्या करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुण्याला मुबलक पाणी आहे. मात्र, योग्य वितरण नसल्याने आणि गळती असल्याने प्रतिमाणशी मुबलक पाणी असूनही पुण्याचा काही भाग तहानलेला असे चित्र आहे. त्यासाठीच नागपूरप्रमाणे पुण्यातही समान पाणीपुरवठा योजना आणली आहे.