लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : ‘राजकारण हे मैदानात उतरून करावे लागते. तेव्हा यश मिळते. राजकारण घरी बसून करत येत नाही,’ असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

‘श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन’च्या वतीने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संघर्षयोद्धा’ पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंदगिरी महाराज, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार विजय शिवतारे, सुनील शेळके, महेंद्र थोरवे, राहुल कुल, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे उपस्थित होते.

‘राजकारणात ‘तुम लडो हम कपडे संभालते है,’ अशी अवस्था चालत नाही. नेता खंबीरपणे पाठीशी उभारणारा पाहिजे,’ असे सांगून शिंदे म्हणाले, ‘राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे. आम्ही लोकांसाठी राजकारण, समाजकारण करत असून, खुर्चीसाठी करत नाही. पदे, येतात जातात, वर-खाली होतात. मी कधीच स्वतःला मुख्यमंत्री समजलो नाही. सामान्य माणूस होतो. आता ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहे. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सर्वांत वरची आहे. सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद केली जाणार नाही.’

‘सत्तेला लाथ मारून आम्ही सर्वांनी उठाव केला. ४० आमदार माझ्यासोबत आले. मला पुरस्कार मिळाल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे. तीन वर्षे झाले, तरी पोटदुखी थांबत नाही,’ असा टोला खासदार संजय राऊत यांना लगाविला.

Story img Loader