पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली.

‘बीज सोहळा रविवारी ( १६ मार्च) देहू नगरीत साजरा होणार आहे. या पवित्र सोहळ्यात वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,’ असे मोरे यांनी सांगितले. देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे या वेळी उपस्थित होते.

या पुरस्कारांतर्गत एकनाथ शिंदे यांना वैभवी पगडी, शाल, उपरणे, वीणा, चिपळ्या, पुष्पहार, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. शिंदे यांनी पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा-सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. हा सन्मान २५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता, असे मोरे यांनी सांगितले.

बीज सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

बीज सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी पहाटे तीन वाजता काकड आरती, पहाटे सहा वाजता वैकुंठगमनस्थळी पूजा, सकाळी दहा वाजता श्रींची पालखी हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. दहा ते बारा दरम्यान हभप देहूकर महाराज मोरे यांचे कीर्तन होणार आहे.

Story img Loader