पुणे – महाराष्ट्र पोलिसांचा जो नावलौकिक आहे, त्याला मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी बट्टा लावण्याचे काम केले. त्यामुळे, पुन्हा महाराष्ट्र पोलिसांना नावलौकिक मिळाला पाहिजे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली.
राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची परिषद उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर भूमिका मांडली. या परिषदेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदललेल्या सत्तांतरात बदल्या आणि भ्रष्टाचार याला समोर जाव लागणार नाही. आम्ही एवढ्यात बदल्या केल्या त्यामध्ये कोणालाही भ्रष्टाचाराला सामोर जावे लागल नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. तसेच, आता अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने पारदर्शकपणे कामे केली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ड्रग्स विरोधात एक मोहीम हाती घेण्याचा मानस
ड्रग्स विरोधात एक मोहीम हाती घेण्याचा मानस परिषदेत अधिकारी वर्गासमोर बोलवून दाखविला असून, त्याचे नियोजन आम्ही करीत असल्याचे फडणवीस म्हणाले. सध्या पोलिसांसमोर कोणती आव्हाने आहेत या प्रश्नावर, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेषत: वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने होत आहेत. कुठे जातीय, तर कुठे धार्मिक तणाव निर्माण होत आहे. या गोष्टी कशा कमी करता येतील, त्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे : कृषी विभागाच्या सर्व बैठकांना आता तृणधान्याचा अल्पोपाहार
सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यावर, सायबर क्राईम रोखण्यासाठी केवळ पोलीस ठाणे वाढवून चालणार नाही. सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे, कायद्यात बदल अपेक्षित आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत कायद्यात बदल करण्यासंदर्भात आम्ही सूचना केल्या होत्या. केंद्र सरकारकडून या अधिवेशनात सायबर गुन्हे रोखण्यासाठी कायद्यात बदल होतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. मुंबईत छोटा राजनचे पोस्टर लावण्यात आले होते त्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यावर, जरूर कारवाई होईल, असेही फडणवीस म्हणाले.
योग्य वेळी योग्य गोष्टी समजतील
शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. यावर योग्य वेळी त्याचा खुलासा केला जाईल, असे सांगत भाजप सत्यजित तांबे यांना निवडणुकीत पाठिंबा देणार का? या प्रश्नावर, मी पुन्हा सांगतो आपण परिस्थितीवर नजर ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्टी आपणास समजतील, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली