लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या २६ किलोमीटर जलवाहिनीचे अंतर जास्त नाही. त्याचे काम वर्षभरात पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन कोणत्याही परिस्थितीमध्ये महिन्याभरात करून महापालिकेच्या ताब्यात जागा द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सोमवारी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील पंप हाऊस, चिंचवडमधील तारांगण प्रकल्प आणि आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या उद्घाटनासह विविध कामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, सुमित्र माडगूळकर या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-पुणे: खडकवासला धरणाच्या पाण्यात पाय टाकलात तर होईल खिसा रिकामा
फडणवीस म्हणाले,की पिंपरी-चिंचवड वेगाने वाढणारे शहर आहे. शहर वाढताना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्त्वाची आहे. आंद्रा आणि भामा आसखेड या दोन धरणातून २६७ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी शहराला आरक्षित केले. शहरात पिण्याचे पाणी योग्यप्रकारे येते की नाही, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. यातून शहरातील पाणी समस्येवर तोडगा निघणार आहे. त्याचबरोबर उर्वरित आरक्षित पाणी येईपर्यंत वाढत्या भागाला पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यासाठी पुढचा जलवाहिन्यांचा टप्पा महत्त्वाचा असून २६ किलोमीटरच्या जलवाहिनीसाठी जागा भूसंपादित करावयाची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एका महिन्याच्या आत संपूर्ण जागा महापालिकेला दिली पाहिजे. त्याबाबत काहीही अडचण असेल,तर माझ्याकडे बैठक घेतली जाईल. २६ किलोमीटरची जलवाहिनी टाकायला वेळ किती लागतो. महापालिकेने एक वर्षाच्या आत वेगाने हे काम पूर्ण करावे. पुढच्या दोन वर्षात शहराला पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळाले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.
आणखी वाचा-धक्कादायक! पुणेकरांना चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची ‘अशी’ होते गळती
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बंधनकारक
फडणवीस म्हणाले,की सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पिंपरी-चिंचवडचा भाग औद्योगिक आहे. ५० किलोमीटरच्या एमआयडीसी भागाला महापालिकेने प्रक्रिया केलेले पाणी विकत घेणे बंधनकारक केले आहे. प्रक्रिया केलेले पाणी घेतले नाही तर, पिण्याचे पाणी औद्योगिक वापरासाठी घेऊ देणार नाही असा नियम तयार केला आहे.
शहराची उंची वाढली
नाट्यगृहाला गदिमांचे नाव देऊन शहराची उंची वाढली, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले,की साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात ग.दि. माडगूळकर यांचे नाव अमर आहे. गीतरामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा अजरामर करणाऱ्या गदिमांना आधुनिक वाल्मीकी म्हणून ओळखले जाते. पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला. हिंदी चित्रपट क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढविण्याचे काम पिंपरी महापालिकेने केले आहे.