पुणे : जागतिक दर्जाचे माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्र अशी ओळख असणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासह या परिसरात नवीन उद्योग येण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. या परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधा पूर्ण कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी औद्योगिक संघटनेच्या मागण्यांबाबत बुधवारी बैठक घेतली. ते म्हणाले की, हिंजवडी, माण, मारुंजी गावच्या हद्दीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित करण्यात आले आहे. येथील कंपन्यांना पूरक वातावरण देण्यास राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे समन्वयाने आणि तातडीने निराकरण करावे. उद्योग, नोकरीनिमित्त हिंजवडीत येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत याठिकाणचे रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.

हेही वाचा…कौतुकास्पद! पिंपरी- चिंचवडमध्ये भरतीसाठी आलेल्या तरुणांची पोलिसांनी केली राहण्याची सोय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आपल्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी १० टन क्षमतेचा प्रकल्प उभारत आहे. मात्र, एमआयडीसी परिसरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील घनकचऱ्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १०० टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु करावी. एमआयडीसी हद्दीत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस चौकी उभारावी. यासाठी हिंजवडी औद्योगिक संघटनेने सहकार्य करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.

बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशीष शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हिंजवडी औद्योगिक संघटनेचे कॅप्टन चरणजित भोगल आणि सचिव लेफ्टनन्ट कर्नल (निवृत्त) योगेश जोशी आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

हेही वाचा…मोजक्याच दुष्काळी भागांना ‘संजीवनी’, ‘पोकरा’ प्रकल्पांतर्गत साडेचार हजार कोटींपैकी ६० टक्के रक्कम तीन जिल्ह्यांतच खर्च

कोंडी टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

-हिंजवडीतील रस्ते रुंद करावेत.

-सर्वच रस्त्यांवर सहा मार्गिका ठेवाव्यात.

-आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत.

-सेवा रस्त्यांची रुंदी वाढवावी.

-रस्त्यांवरील खड्डे भरावेत.

-दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे तत्काळ मार्गी लावावीत.

-पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उभारावी.

हेही वाचा…पुणे : जमीन व्यवहारात निवृत्त मुख्याध्यापिकेची दोन कोटींची फसवणूक; दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा

हिंजवडी परिसराचा वेगाने विकास करण्यासाठी या परिसरात पायाभूत सुविधांची गतीने उभारणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शुक्रवारी आणि शनिवारी या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची पावले उचलावीत. – अजित पवार, उपमुख्यमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar directs urgent measures to alleviate traffic congestion and basic infrastructures in hinjewadi it hub in meeting with government officers pune print news stj 05 psg