गेल्या दोन वर्षांपासून देशात ठाण मांडून बसलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सण-उत्सवांवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. दरवर्षी होणारा दिवाळी पहाटचा कार्यक्रम देखील गेल्या वर्षी करोनामुळे होऊ शकला नव्हता. यावेळी करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळालं असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आजपासून महाराष्ट्रात नाट्यगृह आणि सिनेमागृहांना ५० टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पुणेकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलेल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या बाबतीत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दर आठवड्याप्रमाणे आज पुण्यात घेतलेल्या करोनाच्या परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील करोनाच्या सद्य परिस्थितीविषयी माहिती दिली. तसेच, देश पातळीवर १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडलेला असताना राज्यात १० कोटींहून जास्त तर पुण्यात १ कोटी १७ लाखांहून डास्त लसीकरण झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात..
दरम्यान, पुण्यात करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर इतर निर्बंधांप्रमाणेच दिवाळी पहाट कार्यक्रमांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये देखील शिथिलता देण्यात आली आहे. यानुसार, पुण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असून त्यासंदर्भातली नियमावली सविस्तरपणे स्पष्ट केली जाईल. सभागृह किंवा खुल्या मैदानातील कार्यक्रमांचे नियम या दिवाळी पहाट कार्यक्रमांना लागू असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!
“महाराष्ट्रात १० कोटींहून जास्त लसीकरण झालं असून पुण्यात १ कोटी १७ लाख लसीकरण झालं आहे. एकूण राज्याच्या तुलनेत १२ ते १३ टक्के लसीकरण केलंय. तर देशाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रानं लसीकरण केलं आहे. पुण्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. करोनाचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून येत आहे. रुग्णसंख्या देखील कमी दिसून येत आहे”, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.
वृद्धांनी अधिक काळजी घेण्याची गरज!
दरम्यान, पुण्यात वयोवृद्धांना दुसऱ्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याचं प्रमाण तुलनेनं जास्त असल्याची माहिती अदित पवारांनी दिली. “पुण्यात पहिल्या डोसनंतर ०.१९ टक्के व्यक्तींना करोना झाला तर दुसऱ्या डोसनंतर ०.२६ टक्के लोकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात ६०-६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातल्या लोकांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे. त्यामुळे वृद्ध लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे”, असं ते म्हणाले.
आजपासून थिएटर्स, नाट्यगृह आपण सुरू केली आहेत. सध्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. दिवाळीनंतर अंदाज घेऊन १०० टक्के उपस्थितीची देखील परवानगी दिली जाऊ शकते, असं देखील त्यांनी सांगितलं.