करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना एकीकडे सुरू असताना दुसरीकडे वेगाने लसीकरण देखील होत असल्यामुळे या संकटावर नियंत्रण मिळण्याचा विश्वास वाढू लागला आहे. त्यासोबतच, करोनाची रुग्णसंख्या देखील आटोक्यात आल्याचं गेल्या काही दिवसांच्या राज्यातल्या आकडेवारीवरून दिसत आहे. वाढतं लसीकरण आणि आटोक्यात असलेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर आता पुण्यात निर्बंध अजून शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…म्हणून शाळा सुरू करण्याचा निर्णय!

राज्य सरकारने ४ ऑक्टोबरला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील मान्यता मिळाली आहे. त्यानुसार करोनामुक्त झालेल्या ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविषयी अजित पवारांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. “ऑनलाईन जरी शाळा घेतल्या तरी त्याला खूप मर्यादा येत होत्या. शेवटी शाळेतलं वातावरण, मुलांनी एकत्र बसणं हा अनुभव महत्त्वाचा असतो. त्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे”, असं ते म्हणाले.

१ ऑक्टोबरला महत्त्वपूर्ण बैठक

“पुणे जिल्हा, शहर आणि पिंपरी चिंचवडची परिस्थिती बरी आहे. काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत येत्या १ तारखेला (१ ऑक्टोबर) बैठक होईल. करोनाच्या कोणत्या नियमांमध्ये शिथिलता देता येईल याबाबत सगळे आमदार, खासदार, अधिकारी मिळून घेणार आहोत”, अशी माहिती यावेळी बोलताना अजित पवार यांनी दिली.

स्विमिंग पूलच्या नियमात शिथिलता

दरम्यान, स्विमिंग पूलबाबतच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. “स्विमिंग पूलबाबत आपण खेळाडूंना परवानगी दिली होती. आता दोन्ही डोस झालेल्या सामान्य नागरिकांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण हे सगळं होत असताना ग्रामीण असो वा शहरी भाग असो, मास्क सगळ्यांनी वापरलंच पाहिजे. त्यात तडजोड केली जाणार नाही. हे संकट नियंत्रणात यावं आणि संपून जावं, त्यासाठी मास्क वापरणं गरजेचं आहे. तशा सूचना पोलीस आणि वरीष्ठांना दिल्या आहेत”, असं ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar pune guardian minister hints withdrawal of corona restrictions pmw