पुणे : महाराष्ट्र कृषी सेवा गट ‘अ’ मधील कृषी उपसंचालकांच्या बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना अधीक्षक कृषी अधिकारी पदावर बढती मिळणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२१-२२ च्या निवड सूचीमधील पात्र अधिकाऱ्यांच्या यादीला मान्यता दिली असून, त्यात ८१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बढतीमुळे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला (स्मार्ट) सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!
हेही वाचा <<< पावसामुळे शहरभर वाहतूक कोंडी; प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद
आयुक्तांनी काढलेल्या परिरत्रकांनुसार यादीत समावेश असलेल्या कृषी उपसंचालकांनी आपल्या पसंतीचा एक महसूल विभाग नमूद करून अन्य पूरक कागदपत्रांसह आपला अर्ज १४ सप्टेंबरअखेर दिलेल्या मेल आयडीवर पाठवायचा आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. या सर्व प्रक्रियेवर कृषी सहसंचालकांनी लक्ष ठेवायचे आहे. हा आदेश कृषी आयुक्तांनी नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर आणि पुणे विभागाच्या कृषी सहसंचालकांना काढला आहे. गील अनेक वर्षांपासून ही बढती प्रक्रिया रखडली होती. आता या बढतीद्वारे आत्मासाठी सर्वांधिक २४ आणि स्मार्ट प्रकल्पासाठी १४ अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. हे संभाव्य १४ अधिकारी स्मार्टमध्ये रुजू झाल्यास कासव गतीने सुरू असलेल्या स्मार्टला गती मिळणार आहे.
हेही वाचा <<< स्मार्ट सिटी पाण्यात गेल्यानंतर अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे
बढतीतही रुसवे-फुगवे
बढती प्रक्रियेत ८१ अधिकाऱ्यांना बढती मिळणार आहे. यातील बहुतेक अधिकाऱ्यांची बढती रखडली होती. पंधरा वर्षांहून अधिक काळ होऊनही त्यांना बढती मिळत नव्हती. त्यामुळे ज्येष्ठ व अनुभवी अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण, काही अधिकाऱ्यांनी अगदी दहा वर्षांहून कमी काळ काम केलेले असूनही, त्यांची नावे बढतीच्या यादीत आहेत. या बाबत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.