पुणे : राज्यात ६४२ अभ्यासक्रमांसाठी मुलींना शंभर टक्के शुल्कमाफी मिळणार आहे. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांनीही थोडे थांबावे. शुल्क भरल्याशिवाय मुलींना प्रवेश न देणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिला. मुलींना पैसे न घेताच प्रवेश द्यायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या विषयातील उत्कृष्टता केंद्राचे (एक्सलन्स सेंटर) उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी बहुउद्देशीय संगणक प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले.
पाटील म्हणाले, की शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. शासकीय संस्थांनी उद्योगांसोबत सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. केंद्र सरकारही शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी निधी देण्यास तयार आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन संस्थांनी नव्या कल्पना समोर आणाव्यात, त्यानुसार उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. शासकीय तंत्रनिकेतन अधिक समृद्ध आणि परिपूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. त्यासाठी मंजूर केलेल्या तीन उत्कृष्टता केंद्रांपैकी पहिले पुण्यात सुरू होत आहे. ४१ तंत्रनिकेतनांमध्ये १ हजार ६०० विद्यार्थ्यांसाठी सीईटीची क्षमता वाढवून संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.
ऐतिहासिक शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये पहिले उत्कृष्टता केंद्र सुरू होण्याचे वेगळे महत्त्व आहे. तंत्रनिकेतनमध्ये अनुभवाधारित शिक्षणाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असे शिरोळे यांनी सांगितले.