पिंपरी: श्री संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर महाराज यांनी समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागून यापुढे असली बेजबाबदार वक्तव्ये बंद करावीत. नाहीतर नाठाळाला वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा इशारा तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हभप संभाजी महाराज देहूकर यांनी दिला आहे.मती भ्रष्ट झालेल्या बागेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक उचापती सुरू आहेत. शुद्ध, सात्त्विक वारकरी-भागवत संप्रदाय विटाळण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या तथाकथित पाठीराख्यांची उठाठेव पुण्यनगरीत चालू असल्याची टीकाही त्यांनी केली.

बागेश्वरमहाराज यांनी काही महिन्यांपूर्वी संत तुकाराममहाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. बागेश्वरमहाराज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. संत तुकाराममहाराजांवर केलेल्या टीकेचा समाचार संभाजीमहाराज देहूकर यांनी घेतला आहे. ते म्हणाले, की आध्यात्मिक किंवा संप्रदायात मोठे असल्याचे मिरवण्यासाठी संत आणि संतचरित्राची निंदा करणारे बागेश्वर महाराजांसारखे रागेश्वरी, भ्रमिष्ट, निंदक हे तुकोबारायांच्या काळातही होते. आजसुद्धा आहेत, हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे दुर्दैव म्हणावे लागेल. ‘तुकोबारायांबाबत बागेश्वरमहाराज यांनी खोडसाळपणे वक्तव्य केले आहे. त्यांचा हा मूर्खपणा कोणालाच मान्य नाही. आध्यात्मिक सत्याचा खून करून असत्याचा डांगोरा पिटणाऱ्या भोंदूबाबाचा आम्ही निषेध करत आहेत,’ असेही ते म्हणाले.

Story img Loader