पुणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही शहरातील विविध रस्त्यांवर आणि चौकांमध्ये लावण्यात आलेले राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक ‘जैसे थे’ आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर तरी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला शहरभर लावण्यात आलेले हे बेकायदा फ्लेक्स काढण्यास कधी मुहूर्त मिळणार? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक चौकाचौकांत आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. या जाहिरात फलकांमुळे पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडत असल्याचे समोर आले आहे. बेकायदा पद्धतीने लावण्यात आलेल्या या जाहिरात फलकांवर कारवाई करून ते तातडीने काढून टाकावेत, असे आदेश गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला दिले होते. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष केले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा…कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण, का आली ही वेळ !

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुतांश राजकीय पक्षाच्या इच्छुकांकडून हे फ्लेक्स जागोजागी लावण्यात आलेले आहेत. विधानसभा मतदारसंघात स्वतःच्या नावाची चर्चा व्हावी यासाठी तीर्थयात्रा, आरोग्य शिबिर, दिवाळी फराळ वाटप यासह अन्य प्रकारचे उपक्रम घेतले जात आहेत. त्याची माहिती देऊन नागरिकांच्या चर्चेत राहण्यासाठी हे फ्लेक्स लावले आहेत. हे फ्लेक्स लावताना महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने पालिकेचे उत्पन्न देखील बुडत आहे. काही चौकांमध्ये तर मोठ्या आकारातील हे बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आल्याने वाहतूक नियंत्रण दिवे तसेच माहितीचे फलक देखील झाकून गेले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेल्या वेळेपासून आचारसंहिता लागू होते. त्यामुळे आचारसंहिता सुरू झाल्यानंतर शहरभर लावण्यात आलेल्या या राजकीय पक्षाच्या बेकायदा फ्लेक्सवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, आकाशचिन्ह विभागाच्या कारवाईचा वेग पाहता महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग हे फ्लेक्स नक्की काढणार कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा…बाजार समितीतील ‘सेस’ कायम, राज्य सरकारकडून १२ तासांत अध्यादेश मागे

शहरातील सर्व राजकीय व अन्य बेकायदा जाहिरातीचे सर्व फलक गुरुवारी दुपारपर्यंत काढून टाकले जातील. याबाबत सूचना आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत.- पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite after election code of conduct political billboards remain prevalent in city pune print news ccm 82 sud 02