पुणे : जगभरात मंकीपॉक्सचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे. आफ्रिकेतील देशांसह पाकिस्तानमध्येही हा संसर्ग पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. देशात अनेक राज्यांत आफ्रिकेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे काही राज्यांनी आपापल्या आरोग्य यंत्रणांना अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राने मात्र केंद्राकडून मार्गदर्शक सूचना नसल्याने त्या काढता येत नसल्याचे तांत्रिक कारण समोर केले आहे.

जगभरात मंकीपॉक्सचा संसर्ग वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्टला हे चिंताजनक आरोग्य संकट म्हणून जाहीर केले. मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या आफ्रिकेतील देशांमध्ये वाढत आहे. त्याच वेळी पाकिस्तानमध्येही या रोगाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी (१७ ऑगस्ट) उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यांना दिले. याचबरोबर भारतात एकही रुग्ण आढळला नसल्याने घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी सर्व राज्यांच्या आरोग्य विभागांची बैठक रविवारी (ता.१८) घेतली. यात त्यांनी राज्यांना उपाययोजनांचे निर्देश दिले.

आणखी वाचा-पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ

विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बैठकांचा धडाका सुरू असताना अद्याप मंकीपॉक्सबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सबाबत २०२२ मध्ये मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या. महाराष्ट्रात अद्यापही २०२२ च्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला जात आहे. केंद्राने मार्गदर्शक सूचना न काढल्याने महाराष्ट्रानेही मार्गदर्शक सूचना काढलेल्या नाहीत. त्यामुळे मंकीपॉक्सबाबत नेमक्या काय उपाययोजना करावयाच्या, असा प्रश्न आरोग्य यंत्रणांसमोर उपस्थित झाला आहे.

मुंबई, पुण्याला धोका अधिक

मुंबई आणि पुण्यात परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातही आफ्रिकी देशांतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे या शहरांत मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याचा धोका आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणा कोणतीही पावले सध्या याबाबत उचलताना दिसत नाहीत. याच्या उलट तमिळनाडू राज्य सरकार आणि दिल्ली व हैदराबाद शहरातील स्थानिक प्रशासनांनी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करून आतापासूनच मंकीपॉक्सचा संसर्ग रोखण्याची पावले उचलली आहेत.

आणखी वाचा- शरद पवार-सुनीता केजरीवाल यांची पुण्यात भेट

मंकीपॉक्सच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी बैठक घेतली. यात त्यांनी उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. देशात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकारने मंकीपॉक्सबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना काढल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून त्या काढल्या जातील. -डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य विभाग