पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील साधू वासवानी पूल पाडून नवीन पूल बांधणीच्या कामामध्ये अडथळा येत नसतानाही अनेक झाडे तोडण्याचा महापालिकेने घातलेला घाट वृक्षप्रेमींनी थेट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणापुढे (एनजीटी) मांडला. सुनावणीमध्ये संबंधित झाडे तोडण्यासाठी ९६ झाडांवर लाल चिन्ह चुकून मारण्यात आले असल्याची कबुली महापालिकेने दिली. ‘अशी चुक पुन्हा करू नका, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल’, अशा शब्दांत न्यायाधिकरणाने महापालिकेस फटकारले.

वाहतुकीस धोकादायक झाल्याने कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल पाडून तेथे महापालिका प्रशासनाच्या विशेष प्रकल्प विभागाकडून नवीन पूल बांधण्यात येत आहे. मात्र, संबंधित पुलाजवळील जुन्या ९६ झाडांवर ही झाडे तोडण्यासाठी त्यावर लाल रंगाने चिन्हांकित करण्यात आले होते. हा प्रकार पुणे संवाद या संघटनेचे अमित सिंग, सत्या नटराजन, गंगोत्री चंदा, सेक्‍युलर कम्युनिटी यांच्यामार्फत ॲड. मैत्रेय घोरपडे यांनी याचिकेद्वारे ‘एनजीटी’ पुढे मांडला, याबाबतची माहिती त्यांनी शुक्रवारी दिली. यावेळी ॲड. मानसी ठाकरे या वेळी उपस्थित होत्या.

हे ही वाचा…पिंपरी : टाटा मोटर्सच्या कामगारांना ४९ हजारांचा बोनस

यासंदर्भात एनजीटीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी समिती नेमली. त्यानुसार, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे संचालक अभय पिंपरकर यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या पथकाने जुलै महिन्यात प्रत्यक्षात पाहणी केली. त्यावेळी वृक्ष संवर्धन कायद्यानुसार झाडांचे वय मोजण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही शास्त्रीय पद्धत किंवा तंत्रज्ञान नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. तसेच तोडण्यासाठी ९६ झाडांवर लाल रंगाने चिन्हांकित करण्यात आल्याचे आढळून आले. त्यावेळी महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने ९६ झाडे चुकून चिन्हांकित करण्यात आले, असे सांगितले. त्याची गांभीर्याने दखल घेत न्यायाधिकरणाने, अशी चुक पुन्हा होऊ नये, झाली तर दंडात्मक कारवाई करू, आपली चूक दुरुस्त करा. तोडण्याची झाडे कमी करा. ६१ झाडांचे केलेले डॉकेट रद्द करून १८ झांडाचा प्रस्ताव तयार करून त्याची वृक्ष संवर्धन कायद्याच्या नियमानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिल्याचे घोरपडे यांनी सांगितले. याबाबतचा आदेश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश दिनेश कुमार सिंग, तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी दिला.

वृक्ष वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल अर्जदार आणि प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या हडपसर येथील ज्येष्ठ नागरिक नंदिनीदेवी पंत प्रतिनिधी यांनी लाल चिन्हांकित झाडांची गणना करून ही झाडे वाचविण्यासाठी वैयक्तीक प्रयत्न केल्याचेही न्यायाधिकरणाने विशेष नमूद केले.

हे ही वाचा…महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश

पुलाच्या परिसरातील ११९ पैकी ९६ झाडे तोडण्याचा घाट महापालिकेने घातला होता. महापालिकेच्या त्रुटी पुराव्यांसह आम्ही न्यायाधीकरणासमोर मांडल्या. त्यामुळे उर्वरित झाडे वाचली. विकास म्हणजे फक्त बांधकाम नव्हे, झाडे, पर्यावरणही जपले पाहिजे अमित सिंग, पर्यावरण संरक्षक कार्यकर्ते