पुणे : कोथरूड येथील काकडे फार्म परिसरात रविवारी दिलजीत दोसांझ यांचा म्युझिक कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना राज्याचे मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाला दिल्या होत्या. मात्र पाटील यांच्या सूचना असतानाही कोथरूड मध्ये हा कार्यक्रम ‘ निर्विघ्न ‘ पार पडल्याचे समोर आले आहे.

कोथरूड येथील काकडे फार्म परिसरात दिलजीत दोसांझ यांचा म्युझिक कॉन्सर्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास ५० हजाराहून अधिक नागरिक येण्याची शक्यता होती. तसेच दिलजीत दोसांझ यांच्या आजवरच्या कार्यक्रमाची एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. हा कार्यक्रम घेण्यात येऊ नये यासाठी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यासह विविध राजकीय पक्षाच्या मंडळींनी आणि सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला होता. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.

हे ही वाचा… पुणे : तडीपार गुंडाकडून पिस्तुलासह अमली पदार्थ जप्त, कात्रज भागात कारवाई

दिलजीत दोसांझ यांचा म्युझिक कॉन्सर्टला कोथरूडचे भाजपचे जेष्ठ नेते आमदार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील विरोध केला होता. हा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. आमदार पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून ठोस भूमिका घेतल्याने हा कार्यक्रम रद्द होईल अशी चर्चा होते. मात्र हा कार्यक्रम झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदार पाटील यांनी आवश्यक त्या सूचना दिल्यानंतरही हा कार्यक्रम झाल्याने यामागे कोणती ‘शक्ती ‘ आहे, असा प्रश्न सर्वसामान्य कोथरूडकर नागरिकांना पडला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागल्याची तक्रारी नागरिकांकडून केली जात आहे.

दिलजीत दोसांझ यांच्या म्युझिक कॉन्सर्ट चा कार्यक्रम कोथरूडमध्ये झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन अशी भूमिका आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती. चंद्रकांत दादांचा सूचना असताना हा कार्यक्रम कोथरूड मध्ये झाल्याने यामध्ये नक्की काय घडले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सूचना असताना पोलीस प्रशासनाने हा कार्यक्रम रद्द का नाही केला? अशी विचारणा येथील नागरिकांकडून केली जात आहे.

हे ही वाचा… Maharashtra Assembly Election Result Live Updates : महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? यासह महत्त्वाच्या बातम्या

काय म्हणाले होते चंद्रकांत दादा?

या कार्यक्रमाबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे भूमिका मांडत म्हणाले की, पुण्यात कोथरूडमधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ च्या म्युझिक कॉन्सर्टला माझा स्थानिक आमदार म्हणून तसेच एक नागरिक म्हणून पण माझा विरोध आहे. फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही, तर या कार्यक्रमामुळे ट्रॅफिक जाम आणि कर्कश आवाजाला सुद्धा माझा विरोध आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा,अशा सुचना मी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये हा कार्यक्रम झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन,असे देखील या निवेदनात म्हटले होते.

दरम्यान दिलजीत दोसांज ‘कॉन्सर्ट’ या कार्यक्रमाचा मद्य सेवन परवाना रद्द करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे चरणसिंह राजपूत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.