पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंब एकत्र येऊन दीपावलीचा सण साजरा करणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पाडव्याला गोविंदबागेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते आले असताना, दिवसभरात न फिरकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशिरा गोविंदबागेत हजेरी लावली. त्यानंतर भाऊबीज साजरी करण्यासाठी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार हे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी गेल्याने दिवाळीला एकत्र येण्याची पवार कुटुंबाची परंपरा कायम राहिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा पहिलाच दिवाळीचा सण होता. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, दिवाळीला राजकीय मतभेद विसरून कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले.
पाडव्याला गोविंदबागेत शरद पवारांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते आले होते. मात्र, अजित पवार यांची दिवसभर अनुपस्थिती होती. मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास अजित पवार हे गोविंदबागेमध्ये गेले. त्यानंतर भाऊबीजेला पवार कुटुंब हे अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी एकत्र जमले. सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार या अजित पवारांच्या घरी गेल्या. त्यानंतर शरद पवारही अजित पवारांच्या घरी पोहोचले. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी दिवाळीनिमित्त कौटुंबिक आनंद साजरा करण्यासाठी एकत्र येण्याची पवार कुटुंबाची परंपरा कायम राहिली आहे.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री शिंदे यांनी नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे साजरी केली दिवाळी
जातीचा दाखला खरा; पण…
शरद पवार यांचे जात प्रमाणपत्र समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. याबाबत पवार म्हणाले. ‘माझी जात कोणती आहे, हे सर्वांना माहीत आहे. जन्माने मिळालेली जात लपू शकत नाही. माझ्या जातीचा उल्लेख असलेला शाळेचा दाखला समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे, तो खरा आहे. मी मराठा एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये होतो. त्या शाळेचा दाखला असून, त्यावरील जात, धर्माचा केलेला उल्लेख खरा आहे. मात्र, काही लोकांनी इंग्रजीतील माझ्या जातीपुढे ओबीसी लिहून दुसरा दाखला समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे. मला ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि आस्था आहे. जात-धर्म या विषयांवर मी कधी समाजकारण आणि राजकारण केले नाही’