पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या आणि दुमजली असलेल्या नाशिकफाटा (कासारवाडी) चौकातील जे.आर.डी टाटा उड्डाणपुलाचा संपूर्ण चौक अतिशय धोकादायक बनला आहे. उड्डाणपुलासाठी जवळपास १५० कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्यानंतरही येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. प्रशस्त अशा या चौकात पादचाऱ्यांना चालणे तथा रस्ता ओलांडणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे.

हेही वाचा >>> पुणे महापालिकेचे रस्ते दुरुस्तीचे आठ कोटी खड्ड्यांत

नाशिककडे जाणाऱ्या वळणमार्गावर असलेल्या या चौकाला नाशिकफाटा म्हणून ओळखले जाते. पुणे-मुंबई महामार्गासह रेल्वे स्थानक, एसटी तसेच इतर खासगी बसचे थांबे असल्याने या चौकाला महत्त्व होते. त्यातच आता या ठिकाणी मेट्रो स्थानक झाले आहे. या चौकातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन पिंपरी पालिकेने रेल्वेमार्ग, महामार्ग आणि नदीवरून जाणारा प्रशस्त दुमजली उड्डाणपूल या ठिकाणी बांधला. सुरुवातीला पुलाचा खर्च ९९ कोटी होता. पूल बांधून पूर्ण होईपर्यंत खर्चाचा आकडा १५० कोटींहून अधिक झाल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा >>> पुणे : छाती आणि पाठीतील वेदनांनी ग्रासलेल्या २१ वर्षीय तरुणावर अँजिओप्लास्टी

नाशिकफाटा चौकातील पूल तयार झाल्यानंतर येथील संपूर्ण रचना बदलली. विस्तारित चौकात अनेक व्यवसाय नव्याने सुरू झाले, दाटीवाटीने दुकाने थाटली गेली. या सर्व भरभराटीत रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांचा कोणताही विचार झाला नाही. त्यामुळेच या ठिकाणी रस्त्याच्या कडेने चालणे किंवा रस्ता ओलांडणे अतिशय अवघड बनले आहे. किरकोळ अपघात होणे हे नियमित आहे. रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे वाहतूक मंदावलेली असते. भोसरीकडून कासारवाडीकडे जाताना वळणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. वाहतूक पोलिसांकडून दिखावू कारवाई केली जाते. पालिकेचे पूर्वीपासूनच या चौकातील सुरक्षिततेकडे दुर्लक्ष असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

हेही वाचा >>> पुणे शहरात ई-बाईक धावण्याचा मार्ग मोकळा ; प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

बळकावलेला रस्ता अन् यंत्रणेची डोळेझाक
नाशिकफाटा ते आमंत्रण हॉटेल (फुगेवाडी) आणि कासारवाडी ते शंकरवाडी या मार्गांवर दोन्ही बाजूला असलेल्या कार सुशोभित करणाऱ्या दुकानांचे अतिक्रमण ही मोठी डोकेदुखी बनलेली आहे. रुंदीकरणानंतर वाढलेल्या रस्त्यांवर या व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली. हळूहळू त्यांनी संपूर्ण रस्त्यांवर ताबा मिळवला आहे. पालिका अधिकारी तसेच पोलिसांकडे तक्रारी होऊनही उपयोग होत नसून या अतिक्रमणांकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जाते. नवे आयुक्त शेखर सिंह तसेच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतो आहे.

हेही वाचा >>>शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक

पुलावरचा तो मार्ग बंदच…
नाशिकफाटा उड्डाणपुलावरून पुण्याच्या दिशेने उतरण्याची मार्गिका (रॅम्प) उड्डाणपूल सुरू झाल्यापासून बंदच आहे. वाहतूक पोलीस व महापालिका यांच्यात हा मार्ग सुरू करण्याबाबत एकमत होताना दिसत नाही. यासाठी रहिवाशांची, राजकीय पक्षांची अनेक आंदोलने झाली. मात्र तो रस्ता अद्याप खुला होऊ शकला नाही.

Story img Loader