कारवाईसाठी पुरेसे मनुष्यबळच नसल्याचे वन विभागाचे कारण

दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : तळजाई टेकडीवर दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून पाऊस सुरू होईपर्यंत आग लावण्याच्या घटना घडतात. या आगीत दरवर्षी सुमारे २५ टक्क्यांवरील क्षेत्र जळून खाक होते. गांजा, सिगारेट ओढणाऱ्यांकडून कधी जाणीवपूर्वक तर कधी अनवधानाने आग लागते. दर वर्षी उन्हाळय़ात या घटना घडतात. पण, वन विभाग ढिम्म आहे. या गर्दुल्यांवर कोणतीही कारवाई वन विभाग करीत नाही, विभागाकडे पुरेसे मनुष्यबळच नसल्याचे नेहमीचे कारण पुढे केले जात आहे.

एकांताचा आनंद घेण्यासाठी अनेक मार्गानी अनेक जण टेकडीवर येतात. झाडांच्या आडोशाला बसून गांजा, सिगारेट ओढतात. अनेक ठिकाणी दारू-बिअरच्या बाटल्या दिसून येतात. या व्यसनाधीनांच्याकडून कधी जाणीवपूर्वक वन विभागाला त्रास देण्यासाठी आग लावली जाते, तर कधी नशेत अनवधानाने लागते. पण, त्यांच्या नशेखोरीत लाखमोलाची वनसंपदा खाक होते. दर वर्षी या आगीत हजारो झाडे, कीटक, मुंग्या, सरपटणाऱ्या प्राण्यांचा जीव जातो. पक्षी, साप, ससे, मुंगूस, मोरांचा अधिवास नष्ट होतो. दहा-पंधरा फूट वाढलेली झाडे जळून खाक होतात. पण, अशा प्रकारे आग लावणाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांना जरब बसेल अशी शिक्षा, दंड करावा, अशी कारवाईच वन विभाग करताना दिसत नाही. टेकडीच्या दक्षिणेकडील सिंहगड महाविद्यालयाच्या बाजूस आग लावण्याचे प्रमाण वाढले आहे.

तळजाई संवर्धनासाठी मनसेने अनेकदा आंदोलन केले आहे. गर्दुल्यांकडून जाणीवपूर्वक आग लावली जाते, हे माहीत असूनही वन विभाग काहीच कारवाई करीत नाही. गर्दुल्यांवर कारवाईची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. मनसे प्रमुख राज ठाकरे तळजाईला भेट देणारे होते. पण, टाळेबंदीमुळे नियोजित दौरा होऊ शकला नाही. तळजाईचे विद्रूपीकरण न थांबल्यास मनसे आपल्या स्टाइलने आंदोलन करून वन विभागाला जागे करेल.

जयराज लांडगे, प्रमुख मनसे पुणे उपनगर

तळजाई टेकडीवरील आग लावण्याच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण टेकडीवर सौर ऊर्जेवरील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा विचार आहे. लोकांची अवैध घुसखोरी टाळण्यासाठी सीमािभतींचे कामही लवकरच पूर्ण करणार आहोत. टेकडीवरील वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जागृती केली जात आहे. जाणीवपूर्वक आग लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करणार आहोत. वन विभागाने दिलेल्या वेळेतच लोकांनी टेकडीवर यावे. जंगलाची शिस्त पाळली पाहिजे. लोकांनी सहकार्य केल्यास तळजाईच्या संवर्धनाला अधिक गती येईल.

राहुल पाटील, उप वनसंरक्षक, पुणे विभाग 

Story img Loader