सर्व व्यावसायिक महाविद्यालयांनी त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे सर्व तपशील महाविद्यालयांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे शिक्षण शुल्क समितीने बंधनकारक केले आहे. पुणे विद्यापीठातील अव्यावसायिक महाविद्यालयांमध्ये मात्र विद्यार्थ्यांची लूट होत आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर असे व्यावसायिक अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांनी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे सर्व तपशील त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. महाविद्यालयांनी शिक्षण शुल्क समितीची मान्यता घेतली आहे का, महाविद्यालयाचे शुल्क किती, कोणत्या वर्गाखाली हे शुल्क घेतले जाते त्याचे तपशीलही महाविद्यालयांनी त्यांच्या संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. महाविद्यालयाने शुल्क नियंत्रण समितीकडे पाठवलेला प्रस्ताव तपशिलामध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. जेणेकरून महाविद्यालयाने कोणत्या घटकासाठी किती खर्च आकारला आहे, त्या सुविधा महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत का याची पडताळणी विद्यार्थी करू शकतील. शुल्क नियमित करून घेतलेल्या महाविद्यालयांची यादी शिक्षण शुल्क समितीने त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. शुल्क नियमन करण्यासाठी लावण्यात आलेल्या निकषांचे तपशीलही समितीने त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. शुल्काचे तपशील जाहीर न करणाऱ्या महाविद्यालयाच्या विरोधात कारवाई म्हणून त्यांच्या शुल्कात २० टक्के कपात करण्यात येणार आहे.
दरम्यान, व्यावसायिक महाविद्यालयांनी शुल्काचा तपशील उपलब्ध करून देण्याचे बंधन आहे. मात्र, विद्यापीठाच्या कक्षेत येणाऱ्या अव्यावसायिक अभ्यासक्रम चालवणारी महाविद्यालये मात्र इतर शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शुल्का वसूल करत आहेत. पुणे विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांमध्ये इतर शुल्क किंवा स्टुडंट अॅक्टिव्हिटी फी घेतली जाते. मात्र, या घेतलेल्या शुल्कापैकी बहुतेक शुल्क हे प्रत्यक्ष खर्च होत नसल्याचे माहिती अधिकारामध्ये उघड झाले आहे. सिद्धार्थ शर्मा या विद्यार्थ्यांने या संदर्भात माहिती मागितली होती. पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये ‘अॅक्टिव्हिटी फी’ म्हणून घेतल्या जाणाऱ्या शुल्काबाबत विद्यापीठ पातळीवर अजूनही काही निर्णय घेण्यात आला नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.