पुणे : खोडदस्थित येथील जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोपद्वारे (जीएमआरटी) ‘एबेल : २२५६’ या आकाशगंगा समूहातील रेडिओ प्रारणे टिपण्यात शास्त्रज्ञांना यश आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले असून, जीएमआरटीच्या अद्ययावतीकरणानंतर अधिक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमुळे ही रेडिओ प्रारणे टिपली गेल्याचे मानले जाते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील खगोलभौतिक शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये नेदरलँडच्या लायडन वेधशाळेतील ई. ओसिंगा, आर. जे. व्हॅन वीरेन, एफ. वाझा, इटलीतील बोलोग्ना विद्यापीठातील एम. ब्रिएन्झा, जी. ब्रुनेटी, ब्रॉटियान, बॉनफेड, रिस्ले, डी. डल्लाकासा, मिले, रॉसेटी, कॅझ्यानो, हार्वर्ड येथील स्मिथॉनसीएन खगोलभौतिकी केंद्रतील फॉरमन, जर्मनीच्या युरिंगर वेधशाळेतील ए. द्राबेंट, बॉनासीएक्स, लॉरेन्स बर्कले प्रयोगशाळेतील एस. राजपुरोहित, अहमदाबादच्या भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेतील ए. एस. राजपुरोहित यांचा समावेश आहे. इटलीमधील बोलोग्ना विद्यापीठातील कार्यरत रेडिओ खगोलशास्त्रज्ञ कमलेश राजपुरोहित यांच्या नेतृत्त्वाखाली संशोधन करण्यात आले. जीएमआरटीसहीत नेदरलँड्समधील लो फ्रिक्वेन्सी ॲरे, अमेरिकेतील कार्ल जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे या रेडिओ दुर्बिणींसह ‘एक्सरे मल्टिमिरर न्युटन’ आणि ‘चंद्रा’ या क्ष किरणांद्वारे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणींचीही मदत घेण्यात आली. मात्र राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) जीएमआरटीच्या अधिक संवेदनशीलतेमुळे अद्याप ज्ञात नसलेल्या आकाशगंगांच्या प्रतिमा टिपता आल्या.
पृथ्वी एका सूर्यमालेत आहे आणि सूर्यमाला आकाशगंगेत आहे. अशा लाखो आकाशगंगा विश्वामध्ये आहेत. हजारो लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगाही समूह स्वरुपात (ग्यालेक्टिक क्लस्टर) आहेत. शेकडो ते हजारो आकाशगंगांचे गुरुत्वाकर्षणाने एकत्रित असलेले समूह विश्वातील प्रचंड अशी रचना मानली जाते. असाच पृथ्वीपासून एक हजार दशलक्ष प्रकाशवर्षं पेक्षाही दूर असलेला ‘एबेल:२२५६’ आकाशगंगा समूह त्याच्या जटिल संरचनेसाठी ओळखला जातो. या समूहाचे तापमान दहा लाख सेंटिग्रेडपोक्षाही जास्त असल्याचे, पदार्थाच्या चौथ्या अवस्थेतील युक्त वायूंनी (प्लाझ्मा) भरलेले दिसले आहे. या दीर्घिका समूहात आकाशगंगा समूहात होत असलेल्या आकाशगंगांच्या टकरी किंवा विलिनीकरणामुळे प्रचंड ऊर्जा उत्सर्जित होते. या ऊर्जेचे उत्सर्जन विद्युत चुंबकीय वर्णपटातील क्ष किरणांपासून रेडिओ लहरींमधील प्रारणाद्वारे होते. हे रेडिओ लहरींचे प्रारण संबंधित दुर्बिणीतून अभ्यासल्यास या आकाशगंगा तसेच त्यांच्या समूहाचे आकारविज्ञान कळण्यास मदत होते.
जीएमआरटीद्वारे निरीक्षण केल्यानंतर एबेल:२२५६ या आकाशगंगा समूहातील आकाशगंगांच्या टकरी किंवा विलीनीकरणाबद्दल अधिक सखोल माहिती मिळू लागली आहे. अन्य दुर्बिणींपेक्षा नवीन निष्कर्ष एबेल:२२५६ च्या आकारविज्ञानबद्दल अधिक आगळीवेगळी माहिती देणारे आहेत. तसेच अजूनही माहितीचे विश्लेषण सुरू असल्याने होत असल्यामुळे या आकाशगंगासमूहाची आणखी वैशिष्ट्ये समजण्यास वाव आहे. ‘एबेल:२२५६’बाबतच्या घडामोडी समजू शकतील.
– कमलेश राजपुरोहित, संशोधन गटाचे प्रमुख
अद्ययावत जीएमआरटीच्या अधिक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक प्रणालीमुळे ‘एबेल:२२५६’प्रमाणेच आणखी आकाशगंगासमूहांचा वेध घेणे शक्य आहे. जीएमआरटीमुळे निम्न वर्णपटातील रेडिओ लहरींद्वारे खगोलीय निरीक्षणांसाठी ही खास सुविधा निर्माण झाली आहे.
– डॉ. यशवंत गुप्ता, संचालक, एनसीआरए