पुणे: राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता खराब होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दोनशेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने आता पावले उचलली आहेत. हवा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यामुळे वातावरणातील प्रदूषित वायू आणि धुलिकण हे हवेतच राहिल्याने हवेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. या महिन्यात राज्यात विविध शहरांची हवेची गुणवत्ता खराब झालेली असून, हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या पुढे गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व जिल्हे आणि महापालिकांच्या प्रशासनाला आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली.

हेही वाचा… एनआयएकडून सात दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल

राज्यातील १७ शहरांमध्ये वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या तीव्र आजारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक शहरातील रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागामध्ये तीव्र श्वसनासंबंधी आजारांचे सर्वेक्षण करण्यात येईल. शहरांसाठी नोंदविलेली दैनंदिन एक्यूआय पातळी आणि श्वसनाच्या आजारांचे रुग्ण यांची माहिती संकलित केली जाईल. वायुप्रदूषणाशी संबंधित आजार आणि रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी नोंदविली जाणार आहे. एक्यूआय पातळी आणि हॉट स्पॉट ओळखून तिथे आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यात येतील, असे सारणीकर यांनी स्पष्ट केले.

हवा गुणवत्ता निर्देशांक (५ नोव्हेंबर सायंकाळी ५.३० वाजता)

मुंबई – १९४
पुणे – १८३
नागपूर – १४४
नाशिक – १३९
छत्रपती संभाजीनगर – १२३

प्रदूषणामुळे आरोग्याला धोका

एक्यूआयहवेची गुणवत्ताआरोग्यावर परिणाम
०-५०चांगलीअतिशय कमी परिणाम
५१-१००समाधानकारकआजारी व्यक्तींना श्वसनास किरकोळ त्रास
१०१-२००मध्यमफुफ्फुस, दमा, हृदयविकार असलेल्यांना श्वसनास त्रास
२०१-३००खराबसर्वच जणांना श्वसनास त्रास
३०१-४००अतिशय खराबश्वसनविकाराचा धोका
४०१-५००तीव्रनिरोगी व्यक्तींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deterioration of air quality is a threat to health so health department has started taking measures to prevent air pollution pune print news stj 05 dvr