शाळा, महाविद्यालयात झालेली मैत्री ही काही वेळा त्या-त्या काळापुरती राहत असली, तरी काहींच्या मैत्रीचे नाते इतके घट्ट असते की ते शाळा, महाविद्यालय संपले तरी हे मैत्र कायम टिकते. इतकेच नाही तर त्या मित्रांमध्ये कौटुंबिक नाते निर्माण होते. हे सगळे मित्र मौजमजेसाठी केवळ एकत्र येतात इतकेच नाही, तर ते एकमेकांच्या अडीअडचणीलादेखील उपयोगी येतात. या सगळ्यांमध्ये एक धागा असतो तो म्हणजे ‘सामाजिक भान.’ यामुळेच आपल्या वेळात वेळ काढून सामाजिक कार्य करण्याबरोबरच वेळप्रसंगी पदरमोड करून ते सामाजिक कार्यात सहभागी होतात. या कार्यात पुण्यातील पुणे विद्यार्थी गृहाच्या १९८८ साली दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा ‘आपण सारे’ हा समूह असो अथवा नाशिकच्या पेठे विद्यालयातील मित्रांचा समूह असो.
निराधार मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती देणाऱ्या ‘पालवी’ या पुस्तकाच्या निर्मितीबरोबरच ज्येष्ठ-तरुणाईमधील विसंवादावर परिसंवाद घेणे, दत्तक मुले आणि पालक यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे, गरजू मित्रांना मदत करणे आदी कार्य ‘आपण सारे’ ने यापूर्वी केलेले आहे.
हेही वाचा…नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे मत
मैत्र जपण्याबरोबर आपल्याच गरजू मित्रांना मदत करणारा पेठे विद्यालयातून १९८९ साली दहावी पास झालेल्या मित्रांचा ‘मैत्र ८९’ हा समूह. या उपक्रमात पुण्यात स्थायिक झालेली मित्रमंडळीही जोमाने कार्यरत असून नोकरी, व्यवसाय सांभाळत सामाजिक कार्यात सहभागी होत आहेत. हे सगळे मित्र समाज माध्यमातून एकमेकांना जोडले गेले. आता या समूहातील मित्रांचा वटवृक्ष झाला असून दोनशे मित्रांच्या समूहाद्वारे आज त्यांचे एक मोठे कुटुंब झाले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या, देशा-विदेशात पसरलेल्या, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतून आलेल्या पण नाशिकशी घट्ट नातं जपणाऱ्या शाळकरी सोबत्यांचा हा समूह गेली दहा वर्षं कौटुंबिक तसेच सामाजिक पातळीवर कार्यरत आहे. या समूहाच्या कार्याची सुरुवात झाली ती वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाने. तेव्हापासून त्यांचे कार्य अविरत न थकता, न डगमगता सुरूच आहे.
या समूहाचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘देवदूत निधी.’ आपल्याच मित्रांना वेळ पडली तर आर्थिक मदत करण्याची संकल्पना घेऊन सुरू झालेल्या या उपक्रमात सगळ्याच मित्रांचा सहभाग असतो आणि हा उपक्रम अत्यंत जिव्हाळ्याने चालवला जातो. मित्रांनी, आपल्याच मित्रांसाठी आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी उभारलेली कायमस्वरूपी आर्थिक मदत असे या निधीचे स्वरूप आहे. एखाद्या संकटाच्या प्रसंगी ऐनवेळी धावाधाव करून आर्थिक मदत जमवण्यापेक्षा सुनियोजित पद्धतीने उभारलेली ‘गंगाजळी’ म्हणजे हा ‘देवदूत निधी.’ ‘मैत्र-८९’ चे मित्र गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी वाढदिवस, आई -वडिलांचे पुण्यस्मरण, मंगल कार्याची आठवण अशा निमित्ताने यात दिलदारपणे भर घालतात. या समूहातील मित्रांचाच एक गट या निधीचे संकलन, व्यवस्थापन आणि गरजेनुसार विनियोग अत्यंत पारदर्शी पद्धतीने पार पाडतो. या वर्षात सगळ्याच ‘मैत्र’ परिवाराने वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. अनेकांनी हे सुवर्णक्षण साजरे करताना ‘देवदूत निधी’च्या वाढीसाठी मनापासून हातभार लावला.
अकाली मृत्यू झालेल्या मित्रांच्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या परिवारापासून काहींच्या नोकरी-व्यवसायातील अडचणीतील मित्रांच्या वैद्यकीय, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक अडचणी अशा विविध अंगांनी गेल्या ४-५ वर्षांत या समूहातील मित्रांना, त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य केले. यात मदत मिळालेल्या मित्रांच्या शुभेच्छा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेले आशीर्वाद हा उपक्रम पुढे नेत राहण्याची सकारात्मक ऊर्जा कायम देत असल्याची भावना यातील मित्र व्यक्त करतात. कोणाला या मदतीची गरज पडू नये, पण मदत लागलीच तर हक्काचा ‘देवदूत निधी’ नक्कीच उपयोगी पडेल, अशा विश्वासावर उभारलेला हा उपक्रम अखंड चालवण्यासाठी ‘मैत्र-८९’ नेहमीच प्रयत्नशील असते. सत्पात्री दान देण्यासारखे पुण्य नाही असे म्हणतात, पण आपल्याच मैत्र परिवारासाठी काही करता येण्याचा आनंद म्हणजे खरी कृतज्ञता आणि अपार समाधान असल्याच्या भावना यातील मित्रांची आहे. श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com