रियाज करताना गायकाला रंगमंचीय मैफिलीची प्रचिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगतकारांची साथ नसतानाही घरामध्ये रियाज करताना गायकाला रंगमंचीय मैफिलीची प्रचिती देणारे ‘नादसाधना’ हे अ‍ॅप शास्त्रीय संगीताच्या साधकांसाठी उपयुक्त ठरत आहे. या अ‍ॅपद्वारे दररोजचा रियाज केल्याने गायकाची स्वरस्थाने पक्की आणि अचूक होण्यास मदत होत असून जगभरात या अ‍ॅपचा वापर केला जात आहे.

सॉफ्टवेअर अभियंता आणि मेवाती घराण्याचे गायक संदीप रानडे यांनी  संगीताच्या प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘नादसाधना’ अ‍ॅप विकसित केले आहे. ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज, डॉ. शोभा अभ्यंकर आणि अंजली जोगळेकर-पोंक्षे यांच्याकडे संदीप रानडे यांनी मेवाती घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले आहे. संदीप यांनी अमेरिकेतील जॉन्स हॉपकीन विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.

अमेरिकेत असताना गुगल, व्हीएमवेअर आणि मायक्रोसॉफ्ट अशा प्रथितयश कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. मात्र, केवळ संगीताची साधना करण्यासाठी अमेरिकेतील कारकिर्द सोडून ते भारतामध्ये आले.

‘नादसाधना’ या अ‍ॅपमध्ये स्वरमंडल आणि टय़ूनरचा समावेश असून त्याद्वारे गायकाला रियाज करता येतो. आता लवकरच या अ‍ॅपमध्ये तानपुरा, तबला, स्वरपेटी, टाळ आणि एकल तबलावादकांसाठी लेहरा साथ या गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन यासाठी लाभले आहे, असे संदीप रानडे यांनी सांगितले. जुलैपासून कार्यान्वित झालेले हे अ‍ॅप सध्या जगभरातील संगीत साधक वापरत असून त्यांना रियाज करताना मैफिलीची अनुभूती येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये पूर्वी गुरुच्या घरी राहून विद्या ग्रहण करताना तेथे संवादिनी, सारंगी आणि तबला ही वाद्ये वाजविणारे वादक असायचे. आता घरी रियाज करताना हे संगतकार आपल्या वेळेला उपलब्ध होऊ शकत नाहीत.

त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकाराला रियाज करताना वादकांना बोलावणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. ही बाब ध्यानात घेऊन या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे, असे रानडे यांनी सांगितले. स्वर आणि श्रुतींचा अभ्यास करून करण्यात आलेल्या या अ‍ॅपद्वारे रियाज केल्यानंतर रंगमंचीय मैफिलीमध्ये चालणाऱ्या स्वर-लय-तालाच्या ऊर्जेची ९० टक्क्य़ांच्या जवळपास प्रचिती येते, असेही त्यांनी सांगितले.

एका तासामध्ये शास्त्रोक्त रियाज

संदीप रानडे यांनी ‘नादरंग’ या टोपणनावाने वेगवेगळ्या रागांवर आणि अनुभवांवर आधारित जवळपास ७० रचना केल्या आहेत. अनेक वर्षांची साधना आणि सखोल अभ्यास करून संदीप यांनी रियाजाची एक नावीन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. ‘नादयोग’ या आविष्कारामध्ये दहा तासांचा रियाज एका तासामध्ये अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करता येतो. भारत, अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया अशा जगभरातील विविध ठिकाणी संदीप ‘नादयोग’च्या कार्यशाळा घेतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Developing the nadasadhana app for classical music seekers
First published on: 17-02-2019 at 01:16 IST