पुण्याचा चौफेर विकास होऊ लागल्याने मतदारांची संख्या आणि मतदारसंघही वाढत गेले. त्याचबरोबर पुण्याचा कारभार सांभाळणारे नेतृत्वही काळानुसार बदलत गेले आहे. राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असल्यास त्या पक्षाचा खासदार हा पुण्याचा कारभारी म्हणून सक्षमपणे काम पाहत आल्याचे आजवर दिसून आले आहे. मात्र, राज्यात आणि महापालिकेत सत्ता विरुद्ध पक्षाची असल्यास खासदाराचे कारभारी होण्याचे प्रयत्न अपयशी ठरलेले दिसतात. आगामी विधानसभा निवडणुकांनंतर तर पुण्यात वेगळेच चित्र पहायला मिळणार आहे. महायुती विजयी झाल्यास त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रार्ष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असणार आहे, तर महाविकास आघाडीला यश मिळाल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वाटा असणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना शिंंदे पक्ष असो की, काँग्रेस-शिवसेना ठाकरे पक्ष त्यांना ‘राष्ट्रवादी’चा अडथळा असणार आहे. त्यामुळे पुण्याचा नवा कारभारी कोण, याचे त्रांगडे राहणार आहे.
पुणे नगरपालिका असल्यापासून ते आतापर्यंतच्या काळाचा विचार करता विशिष्ट कालावधीनंतर पुण्याचे कारभारी हे बदलत गेलेले दिसतात. काकासाहेब गाडगीळ हे खरेतर पुण्याचे पहिले कारभारी म्हणावे लागतील. १९२८ ते १९३२ या काळात ते तत्कालीन पुणे नगरपालिकेचे सभासद होते. १९२८ मध्ये ते नगरपालिकेत निवडून आले. मात्र, १९३० मध्ये सत्याग्रहात भाग घेतल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यावर ते पुन्हा बिनविरोध निवडून आले आणि नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही निवडून आले. १९३८ मध्ये काँग्रेस पक्षाने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि काकासाहेब गाडगीळ हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियंत्रण मंडळावर सभासद म्हणून निवडून आले आणि ते अध्यक्षही झाले. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्याने पुण्यावर काँग्रेसची सत्ता होती आणि काकासाहेब गाडगीळ हे पुण्याचे कारभारी म्हणून कामकाज पाहत होते.
हेही वाचा >>>पिंपरी : पहिल्याचदिवशी विद्यमान आमदारांसह प्रमुख पक्षांतील इच्छुकांची उमेदवारी अर्जासाठी गर्दी, ‘यांनी’ घेतले अर्ज
काँग्रेसनंतर पुण्यावर समाजवादी चळवळीचा प्रभाव होता. त्या वेळी समाजवादी नेत्यांच्या हाती पुण्याची सूत्रे होती. ना. ग. गोरे, एस. एम. जोशी यांनी पुण्याचा कारभार सक्षमपणे पाहिला. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाकडून गोरे हे खासदार म्हणून निवडून आले. गोरे यांनी पुण्याचे महापौरपदही भूषविले होते. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त समाजवादी पक्षाकडून एस. एम. जोशी हे पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले. १९७० पर्यंत पुण्याचा कारभार समाजवादी विचारवंतांनी हाकला. त्यानंतर पुन्हा बदलाचे वारे वाहू लागले आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांच्याकडे काही काळ पुण्याचे नेतृत्व होते. धारिया हे पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते.
पुण्याचे नेतृत्व १९८० नंतर माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हाती गेले. किमान सलग १५ वर्षे गाडगीळ यांनी पुण्याचे कारभारी म्हणून काम पाहिले. माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे पुण्यात प्राबल्य निर्माण होईपर्यंत गाडगीळ यांच्या हाती पुण्याची सूत्रे होती. या काळात भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून नावलौकिक मिळवून होता. माजी खासदार अण्णा जोशी यांनी १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत गाडगीळ यांचा पराभव केला. त्यानंतरच्या काळात कलमाडी यांचे नेतृत्व पुण्यात उदयास येऊ लागले.
कलमाडी हे १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर पुण्याचे कारभारी म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. केंद्र, राज्य आणि महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्याची संधी साधत कलमाडी यांनी पुण्यावर प्रभुत्व गाजविले. ‘कलमाडी बोले आणि पुणे चाले’ अशी त्यावेळची परिस्थिती हाती. १५ वर्षांहून अधिक काळ पुण्यावर सत्ता गाजविल्यानंतर कलमाडी पर्वाचा अस्त होऊन भाजपच्या हाती सत्ता गेली. त्यानंतर दिवंगत खासदार गिरीश बापट हे पुण्याचा कारभार पाहू लागले.
महापालिकेत भाजपची सत्ता आणि राज्यातही सत्ता असल्याने भाजपकडून पुण्याचा कारभार चालविण्यात आला. बापट यांच्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे काही काळ कारभार आला. त्यांना पालकमंत्रिपदही देण्यात आले. मात्र, महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आल्यावर अजित पवार हे पालकमंत्री झाल्याने पुण्याचे कारभारी एकमुखी राहिले नाहीत.
आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही महायुती आल्यास पुन्हा पाटील की पवार, असा प्रश्न राहणार आहे. महाविकास आघाडी आल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्यात वर्चस्वासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याचा नवा कारभारी कोण? हा प्रश्न चर्चेत असणार आहे.
sujit. tambade@ expressindia. Com