वर्धापनदिनी नव्याने प्रकल्प हाती घेण्याचा प्रशासनाचा मानस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी शहराचा विकास चंदिगढ शहराच्या धर्तीवर व्हावा आणि शहरातील सामान्य कामगारांना घरे मिळावित, या हेतूने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली. प्राधिकरणाची स्थापना होऊन बुधवारी (१४ मार्च) ४६ वर्ष पूर्ण होत असून प्राधिकरणाला शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात फार मोठे यश आले नव्हते. मात्र आता प्राधिकरणाने नव्याने गृहयोजनांची कामे हाती घेतली असून निवासी, शैक्षणिक भूखंड तसेच वाहनतळांच्या जागा विक्रीसाठी काढल्यामुळे विकासकामेही वेगाने सुरू आहेत.

सन १९७२ मध्ये पिंपरी प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर काही वर्षे भूसंपादन आणि विकास आरखडा जाहीर करण्यात गेली. भूसंपादनाची कामे १९८४ नंतरही सुरुच होती. प्राधिकरणाच्या काही चुकांमुळे त्याकाळी प्राधिकरणाने संपादित केलेल्या भूखंडावर अतिक्रमणे झाली. काही भूखंड मूळ मालकांनी बेकायदेशीररीत्या विकून टाकले. त्यामुळे शहराचे चंदिगढ होण्याऐवजी शहरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणेच झाली. पेठ क्रमांक १ ते ४२ पैकी पेठ क्रमांक १ ते २९ पर्यंत प्राधिकरणाचा विकास काही प्रमाणात झाला. पेठ क्रमांक २९ ते ४२ मध्ये बहुतांश भूखंडांवर अतिक्रमणे झाल्यामुळे प्राधिकरणाला या भागात विकास करता आला नाही. काही पेठा विकसित करण्यात यश आले असले तरी अतिक्रमणे मोठय़ा प्रमाणात आहेत. प्राधिकरणाने विविध पेठांमध्ये सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षणे टाकली आहेत. मात्र, या आरक्षणांचा विकास करण्यात प्राधिकरण प्रशासनाला यश आलेले नाही. प्राधिकरण प्रशासनाचा कारभार गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पूर्णपणे भरकटलेला होता.

शैक्षणिक भूखंड विक्रीसाठी लवकरच जाहिरात

पूर्णानगर चिखली येथील गृहयोजनेनंतर प्राधिकणामध्ये एकाही गृहयोजनेचे काम हाती घेतले नव्हते. त्यामुळे प्राधिकरणाच्या कारभारावर सतत टीका होत होती. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सतिशकुमार खडके यांनी प्राधिकरणाचा कारभार हाती घेतल्यानंतर विकासकामांनी वेग घेतला आहे. पेठ क्रमांक ३०, ३२, १२ मध्ये गृहयोजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय पेठ क्रमांक ४, ६ मध्येही गृहयोजनेच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय पेठ क्रमांक १ ते २८ मधील विविध ठिकाणच्या निवासी भूखंडांची विक्री करण्यात येत आहे. शैक्षणिक भूखंड विक्रीसाठी जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे. वाहनतळाचे भूखंड भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय खुले प्रदर्शन केंद्राऐवजी खुले प्रदर्शन केंद्र केले जाणार असून त्याचे काम प्रगतिपथावर आहे. अशी अनेक विकासकामे सध्या प्राधिकरणामध्ये सुरु आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development works under pimpri authority get speed