काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांनी पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊनही मुलगा सत्यजीत तांबेंसाठी अर्ज केला नाही. तसेच सत्यजीत तांबेंचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यानंतर तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपा सत्यजीत तांबेंना पाठिंबा देऊन भाजपा पुरस्कृत उमेदवार करू शकतो, असेही तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच पत्रकारांनी भाजपाचं नेमकं धोरण काय? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांना विचारला. यावर त्यांनी शुक्रवारी (१३ जानेवारी) पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं नेमकं धोरण गुरुवारी (१२ जानेवारी) चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे योग्यवेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ. नेता म्हणून, व्यक्ती म्हणून, युवानेता म्हणून सत्यजीत तांबेंचं काम निश्चितपणे चांगलं आहे. परंतु सर्व राजकीय निर्णय धोरणाप्रमाणे करावे लागतात, योग्यवेळी करावे लागतात. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी गुरुवारी सांगितलं आहे. तसं ते योग्य निर्णय करतील.”
हेही वाचा : ‘आम्हाला एकनिष्ठ उमेदवार हवा,’ शिक्षक सेनेची भूमिका; सत्यजित तांबेंना नाशिकची पदवीधरची निवडणूक कठीण जाणार?
“हा घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही”
“असं कोणतंही गणित आम्ही घडवलं नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला जरूर गेलो होतो, पण त्याला बाळासाहेब थोरात आणि सर्वच पक्षाचे नेते होते. आपण जातच असतो. राजकीय पक्षांमध्ये एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणं हे काही नवीन नाही. हा घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही. योग्यवेळी सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील. त्याची वाट बघा.”
हेही वाचा : तुम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आदेश का धुडकावला? सत्यजीत तांबे म्हणाले, “अनेक दिवसांपासून…”
“भाजपाने स्वतःचा उमेदवार देणं जाणीवपूर्वक टाळलं आहे का?”
“भाजपाने स्वतःचा उमेदवार देणं जाणीवपूर्वक टाळलं आहे का?” असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “भाजपाने स्वतःचा उमेदवार देणं जाणीवपूर्वक टाळलं, असं नाही. आम्हीही कोण उमेदवार द्यावा या प्रयत्नात होतो. आमची मनापासून इच्छा अशी होती की, राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी. त्याबाबत राजेंद्र विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा सुरू होती. परंतु काही कारणाने असमर्थता दाखवली. अन्यथा आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देणं होतं.”