महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा असून आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या आहेत, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच लाडकी बहीण योजना फसावी यासाठी मविआच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. पुण्यात भाजपाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्र सोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाला. या निवडणुकीत आम्ही मेहनत घेतली होती. मात्र, त्याचवेळी महायुतीविरोधात खोटा प्रचार करण्यात आला. त्याला योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ शकलो नाही. भाजपा सत्तेत आल्यास आरक्षण रद्द केलं जाईल, असा खोटा प्रचार करण्यात आला. पण या देशात जेव्हा जेव्हा आरक्षणाची सीमा संपली तेव्हा भाजपाच्या सरकारने आरक्षणाची सीमा वाढवली. आधी अटलबिहारी वाजपेयी आणि नंतर नरेंद्र मोदी यांनी आरक्षण वाढवून दिले”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – मैदानात उतरा, जोरदार बॅटिंग करा, फक्त हिट विकेट होऊ नका… देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

“महाविकास आघाडीचा विजय एखाद्या फुग्यासारखा”

“जे खोटं असतं, त्याचं वय छोटं असतं. जे खरं असतं, त्याचे वय मोठं असतं. खोटं एखाद्या निवडणुकीत चालतं पण ते सतत चालत नाही. महाविकास आघाडीचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे. भाजपाच्या कार्यकर्त्याने केवळ टाचणी लावली, तरी हा फुगा फुटू शकतो. याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत झाली आहे, या निवडणुकीत महायुतीचे आमदार फुटणार, असा खोटा प्रचार करण्यात आला होता. मात्र, महाविकास आघाडीचे २० आमदार आमच्याकडे कसे आले, हे त्यांनाही समजलं नाही”, असे ते म्हणाले.

“मविआचा इतिहास योजना बंद करण्याचा”

“महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा आहे. आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार आणि मेट्रो सारख्या योजनांचा समावेश आहे”, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“लाडकी बहीण योजना महिलांच्या सन्मानाची”

“महायुतीच्या सराकारने पुन्हा एकदा जनसामन्यांच्या हिताच्या योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सन्मानाची योजना आहे. मात्र, महाविकास आघाडीचे लोक लबाड आहेत. विधानसभेत या लोकांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला. मात्र, हे लोकं गावात लाडकी बहीण योजनेचे पोस्टर लावत आहेत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “ठाकरे सरकारमुळेच मराठा आरक्षण रद्द झालं”; देवेंद्र फडणवीसांची टीका; म्हणजे, “आज जे राजकारण सुरू आहे…”

“योजना फसावी यासाठी मविआच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न”

“महाविकास आघाडीचे लोक लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेत आहेत, मात्र, ते अर्ज दाखल करत नाहीत. याद्वारे महायुती सरकारविरोधात महिलांच्या मनात रोष तयार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे, ही योजना फसावी यासाठी मविआच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू आहे”, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticized mahavikas aghadi in pune bjp party meeting spb
Show comments