पुण्यातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
हेही वाचा – “..तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राहुल नार्वेकरांवर बंधनकारक असेल”, उल्हास बापटांनी सांगितला नियम!
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शाम देशपांडे हे कट्टर शिवसैनिक होते. पण जेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, तेव्हापासून श्याम देशापांडेसारखे सच्चे शिवसैनिक दुखावले गेले. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयसेवक संघावर टीका केली, तेव्हा शिवसेना सोडणारे पहिले व्यक्ती श्याम देशपांडे होते. उद्धव ठाकरे जर संघावर टीका करत असतील, तर मी शिवसेनेत राहू शकत नाही, ते त्यांनी ठणकावून सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा – “शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा गळफास लावून घेणार”, स्वाभिमानीचा सरकारला इशारा; चक्क स्मशानभूमीत आंदोलन
कोण आहेत श्याम देशपांडे?
श्याम देशपांडे हे २०००-२०१२ या कालावधीत कोथरूडचे शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच ते २००८ ते २००९ दरम्यान ते पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपददेखील होते.
उद्धव ठाकरेंनी पक्षातून केली होती हकालपट्टी
दरम्यान, गेल्या वर्षी मुंबईतील एका भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.