ड्रग्ज उत्पादन आणि तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “आता ललित पाटील हातात आला आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच यामुळे अनेकांची तोंडं बंद होणार आहेत, असं सूचक वक्तव्य केलं. ते बुधवारी (१८ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पोलिसांना ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस दलाचे सर्व युनिट कामाला लागले आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांना नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक असं काम करतात त्यांच्यावरही धाड टाकण्यात आली.”

“एक मोठं ड्रग्जचं जाळं बाहेर येईल”

“आता ललित पाटील हातात आला आहे. त्यातून निश्चितपणे एक मोठं ड्रग्जचं जाळं बाहेर येईल. काही गोष्टी ज्या मला आत्ता समजल्या आहेत त्या मी लगेच माध्यमांना सांगू शकत नाही. मी योग्यवेळी सांगेन. पण एवढंच सांगतो की, या कारवाईतून आम्ही एक मोठं ड्रग्जचं जाळं उघड करू,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“बोलणाऱ्या अनेकांची तोंडं बंद होणार”

मी पळालो नाही, मला पळवलं आहे या ललित पाटीलच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते सगळंच बाहेर येणार आहे. पोलिसांच्या या कारवाईतून एक मोठं जाळं बाहेर येणार आहे. तसेच बोलणाऱ्या अनेकांची तोंडं बंद होणार आहेत. आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो यापेक्षा जे ड्रग्जचं जाळं बाहेर येणार आहे त्यावरून अनेकांची तोंडं बंद होणार आहे.”

हेही वाचा : “मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, सर्वांची नावं सांगणार”, ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस म्हणाले…

“कुणालाही सोडणार नाही”

“ससून रुग्णालयावर गुन्हेगारांच्या मुदती वाढवून देण्यात आल्याचा आणि चुकीची प्रमाणपत्रं तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या आरोपांची चौकशी सुरू आहे. कुणालाही सोडणार नाही. सर्व दोषींवर कारवाई केली जाईल,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis first comment on arrest of lalit patil alleged drugs smuggler pbs