लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाली. कार्यक्रमाला विलंब झाला. त्यावरून फडणवीस यांनी कोटी करत ‘महेशदादांनी सकाळी असे सांगितल होते की काही खाऊन येऊ नका, माझ्याकडे तुम्हाला जेवण करायचे आहे. त्यामुळे तीन वाजले तरी मी उपाशी आहे’… असे म्हणताच सभागृह हस्यकल्लोळात बुडाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील पंप हाऊस, चिंचवडमधील तारांगण प्रकल्प आणि आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, सुमित्र माडगूळकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘कार्यक्रमाला सव्वा ते दीड तास उशीर झाला आहे. महेशदादांनी सकाळी असे सांगितले होते की, काही खाऊन येऊ नका, माझ्याकडे तुम्हाला जेवण करायचे आहे. त्यामुळे तीन वाजले तरी मी उपाशी आहे आणि आपणही सगळे उपाशीच असाल हा मला विश्वास आहे. त्यामुळे मी भाषण आटोपते घेतो’
पाणी प्रकल्पासाठी महिन्याभरात भूसंपादन करा
भामा आसखेड आणि अंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी २६ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. ही काही जास्त मोठी पाइपलाइन नाही. त्याचे काम वर्षभरात पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करून महिन्याभरात महापालिकेच्या ताब्यात द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना केली.