पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले. आज, मेट्रो एकच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कामाचे भूमिपूजनही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. “आज सत्तेत असलेले सर्व मंत्री पहिल्या टप्प्यातील उद्घाटनावेळी विविध रोलमध्ये होते”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनावेळी म्हणाले.
“पुणे मेट्रोचा एक टप्पा सुरू करतोय. मोदींच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं. दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात आणि उद्घाटन मोदीच करताहेत. मागच्या टप्प्यातील उद्घाटनाला मीही होतो, शिंदेही होते आणि अजित दादाही होते. पण तिघांचे रोलही वेगळे होते. मी विरोधी पक्षनेता होतो, अजित दादा उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते”, असं देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले.
हेही वाचा >> “नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमीच…”, अजित पवारांकडून स्तुतीसुमनं
“आता मात्र पुण्याच्या स्वप्नांना गती देण्याकरता, महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याकरता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही एकत्रित आलो आहोत. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील उत्तम शहर पुणे आहेच, देशातीलही उत्तम शहर आहे. पण मोदींच्या नेतृत्त्वात ते सर्वोत्तम शहर करून दाखवू असा मला विश्वास आहे. दोन लाईन आता क्रॉस होतात, हे या मेट्रोचं वैशिष्ट्य आहे. एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरता या क्रॉसिंगमुळे मदत होणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.